चार शब्द...
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
'मी बुद्धिभेद किंवा दिशाभूल करत आहे' या आपल्या विधानातील अनावश्यक दटावणीकडे मी दुर्लक्ष करत आहे. माझ्या मतांशी मी प्रामाणिक आहे. परंतु मला 'गजल' या बाबतीत माझ्याहीहून आपल्या अनुभवावर जास्त विश्वास आहे. तेव्हा मला आपल्या प्रतिसादाबाबत बोलणे आवश्यक होत आहे.
१) प्रवृत्ती समांतर नसलेल्या द्विपदी गजलेत असतात : मान्य आहे. नसाव्यात असे माझे मत आहे.
२) समांतर-बिमांतरची काळजी करायला नको - खरे तर मला आश्चर्य वाटले आपली ही ओळ पाहून. विविध गोष्टींची काळजी करत कुठे गजल केली जाते? किंवा कुठलीही कविता ही 'प्रस्थापित अटी' या चॅनेलला पार करून कुठे केली जाते? मुळात कुठल्याही काव्यातील 'सेंट्रल थीम' किंवा 'मध्यवर्ती भावना' ही मनात आधीच रचली गेलेली / सुचलेली नसते काय? त्या भावनेला जगन्मान्य पद्धतीने सादर करणे यासाठी 'गजल' किंवा इतर तंत्र आवश्यक ठरत नाही काय? ( तसे तर तंत्रहीनही रचना असतातच! ) कुठलेही म्हणजे कुठलेही काव्य हे 'स्फुरण्याच्या वेळेला' उत्स्फुर्तच नसते काय? तसे नसते तर कविता हा एक व्यवसाय होऊ शकला असता. उत्स्फुर्तपणे सुचलेल्या मुद्यांना वृत्तबद्ध करण्यासाठी काही मोह सोडावे लागत असतील वगैरे ठीक आहे. पण, उत्स्फुर्तता मान्य केल्यास मुळात काव्य 'समांतर-बिमांतरची' काळजी करून लिहू नये या विधानाला काही बेसिस उरणार नाही. काव्य कशाचीच काळजी करून लिहू नये. आता पुन्हा मुद्दा क्रमांक १ बाबत मुद्दा क्रमांक ३ असे नामकरण करून लिहितो.
३) काव्य कशाचीच काळजी करून लिहू नये. गजल या काव्यप्रकारात प्रत्येक शेर स्वतंत्र कविता आहे. ही दोन विधाने मान्य असल्यास, गजलेचा प्रत्येक शेर कसलीही काळजी न करता लिहावा असे म्हणता येईल. पणः माझे आवडते गजलकार ज्ञानेश यांच्या या ओळी!
स्नेह केवढा मनात यास फारसे महत्व राहिले कुठे..
'स्नेह केवढा! ' असे समोरच्यास फक्त भास व्हायला हवे.
देश चालला किती पुढे! फुगीर आकडे नकाच दाखवू
फक्त येथल्या चुलीचुलीत अन्न रोजचे शिजायला हवे..
या दोन ओळीतील मनस्थिती किंवा प्रवृत्ती पूर्णपणे भिन्न व त्यामुळे रसभंग करणारी वाटत नाही काय? पहिल्यात शायर स्वगत बोलतोय किंवा व्यथित आहे असे वाटताना दुसऱ्यात शायर समाजसेवक आहे असे वाटत नाही काय? अश्या गजला उर्दूमध्ये फारश्या नाहीत ( खरे तर नगण्य आहेत ) असे माझे मत आहे. तिथे होते तेच इथे व्हावे असे माझे मत नक्कीच नाही. पण हजारो शायरांची जुनीच भूमिका आपणही घ्यायला ( आपल्याकडून असे नाही, एकंदरच ) इतका विरोध का व्हावा हे मला समजत नाही. तेही, ऍक्चुअली एकाच प्रवृत्तीच्या गजला स्वतःही करून! त्या शायरांनी तशी भूमिका वगैरे घेतली नाही असे कुणालाही म्हणता येईल, पण आपण जाणताच की अक्षरशः हवी तेवढी उदाहरणे मनस्थितीच्या सातत्याला सिद्ध करणारी आहेत. उलट सिद्ध करणाऱ्या फारच कमी गजला माझ्या वाचनात आल्या आहेत. खरे तर नाहीच!