एक गंमतीशीर गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो.  जगातील सर्वात महाग आणि श्रीमंती कॉफीचं नाव आहे 'कोपी लुवाक'.  ही इंडोनेशियात तयार होते.  कोपी म्हणजे कॉफी आणि लुवाक म्हणजे सिव्हेट कॅट प्राणी (मराठीत या प्राण्याला काय म्हणतात मला माहिती नाही).  या सिव्हेटला कॉफीची फळं अतिशय आवडतात.  तो ही फळं खातो आणि विष्ठेतून बिया बाहेर टाकतो.  शेतकरी लोक ही विष्ठा गोळा करतात आणि त्यातल्या बिया शोधून, धुवून आणि खरपूस भाजून बाजारात पाठवतात.  असं म्हणतात की सिव्हेटच्या पचनक्रियेत कॉफी बीन्स मधील एंझाईम्सचं विघटन केलं जातं, त्यामुळे त्यातलं ऍसिडचं प्रमाण खाली येतं.  या संपूर्ण प्रक्रियेनं ती जगातली एक सर्वात उच्च स्वाद असलेली आणि अतिशय स्मूथ कॉफी होते.  आणि अर्थातच त्यामुळे सगळ्यात महागही...

त्यामुळे आता पुढच्या वेळेस जेवणानंतर कॉफी घ्यायची असेल तर 'कोपी लुवाक'चा स्वाद घ्या! पण पिताना या कॉफीची बीन्स कशी तयार होतात यावर चर्चा करू नका, नाहीतर तुमच्या घरच्यांना कदाचित ती कॉफी घशाखाली उतरायची नाही!