पुस्तक वाचून बरीच वर्षे उलटून गेल्यामुळे नक्की आठवत नाही, पण गांधीजी लहान असताना त्यांनी घरच्यांच्या अपरोक्ष, छुप्या रीतीने मांसभक्षण करण्यासाठी पैसे जमवण्यासाठी म्हणून स्वतःच्याच घरात चोरी केल्याचा जो प्रसंग वारंवार सांगितला जातो, तो बहुधा त्यांच्या 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मचरित्रपर पुस्तकात गांधीजींनी स्वतः उद्धृत केलेला आहे.

(स्वतःच्या आयुष्यातले काही अत्यंत खाजगी स्वरूपाचे तपशीलही गांधीजींनी स्वतः याच पुस्तकात उद्धृत केलेले आहेत.)

अशा उद्धरणांतून चुकीचे संदेश जाऊ शकतात आणि मेंदूत चुकीच्या कल्पनांचे बळकटीकरण होण्याची शक्यता जास्त होते. सबब, 'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकावर तातडीने बंदी आणण्यात यावी अशी या प्रतिसादाद्वारे मी भारत सरकारला जाहीर आणि कळकळीची विनंती करतो.

किंबहुना गांधीवादाचेच नव्हे, तर 'गांधी' या शब्दाचेच भारतातून ज्या दिवशी समूळ उच्चाटन होईल, तो दिवस भारतासाठी खऱ्या अर्थाने 'सोनियाचा दिन' ठरेल.

हे माझे वैयक्तिक मत आहे.

आभारी आहे!

(उपरोध वगळल्यास, कशातून कोण काय संदेश घेतो हे मला वाटते संदेश घेणाऱ्याच्या मानसिक कुवतीवर अवलंबून असते. वर उल्लेख केलेल्या गांधीजी-चोरी प्रकरणातून मला तरी 'माणूस हा स्खलनशील असतो, आणि थोर लोकसुद्धा मुळात सामान्यातूनच वर येऊन आपल्या विचारसरणीने, कृत्यांतून थोर बनलेले असल्यामुळे त्यांच्याही हातून कधीकधी सामान्य माणसाच्या चुका झालेल्या असू शकतात, पण ते त्यातून वर येतात हे महत्त्वाचे' हा संदेश मिळतो. याउलट दुसऱ्या एखाद्याला यातून 'गांधीजींनीही चोरी केली होती, अत एव चोरी करणे हे पाप तर नव्हेच, परंतु थोरपणाचे लक्षण आहे' असाही संदेश जाऊ शकतो. पण म्हणून केवळ कोणी घेणारा एखादा असा चुकीचा संदेश घेऊ शकतो या कारणास्तव गांधीजींच्या पुस्तकावरच मुळात बंदी आणणे हे कितपत योग्य ठरेल?

आपली मते टोकाची आणि चमत्कारिक असतात असे माझे वैयक्तिक मत असू शकते, पण म्हणून आपल्या प्रतिसादांनाच मनोगतावर - किंवा इतरत्र - बंदी आणावी असे मी तरी म्हणणार नाही.)