यंदाच्या आय्‌ए‌एस्‌ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठी भाषकांची संख्या प्रयत्‍न करूनही समजू शकली नाही. ही समजल्याशिवाय टाळ्या वाजवण्यात काही अर्थ नाही. नुकताच आय्‌आय्‌टी प्रवेश परीक्षांचाही निकाल लागला आहे.  त्यांत पास झालेल्या मराठी मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा उदोउदो करण्यात येतो आहे. प्रत्यक्षात, यावेळी जास्त जागा उपलब्ध असल्याने जास्त मुले पास झाली हे सत्य आहे.  जोपर्यंत एकूण उत्तीर्ण मुलांमध्ये मराठी मुले आणि इतर भाषक मुले यांची आकडेवारी मिळत नाही तोपर्यंत वर्तमानपत्रांतून छापून येत असलेल्या दिशाभूल करणाऱ्या असल्या बातम्यांमुळे हुरळून जाऊ नये. महाराष्ट्रातून या परीक्षांना बसणाऱ्या बहुसंख्य मुलांना मराठी येत नसते.

शहा नावाच्या यंदा आयए‌एस झालेल्या मराठी मुलीची मुलाखत आजच रेडिओवर ऐकली. मुलगी ठाण्याची आहे आणि अस्खलित मराठी बोलत होती. मुलगी खरोखरच चलाख वाटली. परंतु मी आली/गेली असले अशुद्ध प्रयोग तिच्या बोलण्यात ठायीठायी होते. तिने ज्या संस्थांमधून अभ्यास केला त्या संस्थेतून पास-औट(म्हणजे मेलेल्या?) झालेल्या तिच्या मार्गदर्शकांचा तिने आपल्या मुलाखतीत उल्लेख केला. मराठी वाक्यरचना करताना आधी मुख्य वाक्यांश(मेन क्लॉज) आणि नंतर दुय्यम(सबॉर्डिनेट) वाक्यांश असू नये, हे तिला माहीत नसावे. महाराष्ट्रीयांना शुद्ध मराठी बोलता येत नाही हे आपले दुर्दैव आहे. सर्व दोष शिक्षणपद्धतीचा आहे.