हे हल्ली चित्रांची चोरी होऊ नये आणि झाली तर उघडकीला यावी म्हणून करणे आवश्यक झाले आहे.

हे लक्षात आले नव्हते. कल्पना चांगली आहे.

(हे म्हणजे आमच्या पुण्यातले हाटेलवाले "हा चमचा/वाटी/कप जे काही असेल ते अमूक‌अमूक हाटेलातून चोरलेले आहे" असे त्या चमचा/वाटी/कप जे काही असेल त्यावर लिहीत असल्याबद्दल एक किंवदंता ऐकली होती - प्रत्यक्ष अनुभव नाही! - तसेच झाले म्हणायचे की! पण आपण म्हणता ते खरे आहे - ब्लॉगवरील आणि सार्वजनिक संकेतस्थळांवरील मजकुराच्या चोऱ्यांचे प्रमाण भरपूर वाढले आहे. त्यामुळे असे उपाय करावे लागतात; नाइलाज आहे.)

पण अशा प्रकारे फक्त चित्रांची चोरी टाळता येईल. मजकुराची चोरी कशी टाळावी? आणि भेळेच्या पाककृतीचे एक वेळ ठीक आहे, पण प्रत्येक मजकूर - अगदी प्रत्येक पाककृतीसुद्धा - अशी केवळ चित्रांतून कशी मांडता येईल?

दुसरे म्हणजे, मजकूर स्पष्ट ठळक हवा हे जरी पटण्यासारखे असले, तरी तो मजकूर पोष्टखाते पोष्टाचे तिकीट पुन्हा वापरता येऊ नये म्हणून शिक्का मारून जसे विद्रूप करते (या प्रक्रियेला इंग्रजीत 'डीफ़ेस' किंवा विद्रूप करणे असेच संबोधतात, असे वाटते.) तद्वत चित्राच्या मधोमध लिहिण्याऐवजी एका कोपऱ्यात लिहिल्यास मजकुराचा कार्यभाग साधणे अधिक चित्रही विद्रूप न होता जसे दिसायला पाहिजे तसे दिसणे असा दुहेरी फायदा होईल असे वाटते.

अर्थात, असा शिक्का हा सामान्यतः सहजरीत्या उपलब्ध असणारे सॉफ्टवेअर वापरून करायचा असल्यामुळे, असा शिक्का मारण्याइतकेच तो शिक्का पुसून त्यावर आपला शिक्का मारणेही फारसे कठीण नसावे असे वाटते. मात्र अक्षरांच्या चौकटीचा रंग (अक्षरांचा रंग नव्हे!) पारदर्शक ठेवून असा शिक्का चित्राच्या बऱ्यापैकी तपशील असलेल्या - मोकळा व एकरंगी नसलेल्या - एखाद्या भागात मारल्यास (जे प्रस्तुत चित्रांत केले आहे.) असा शिक्कापालट बेमालूमपणे करणे कठीण जावे व केल्यास सहज उघडकीस यावे असे वाटते.

पण तरीही शिक्का मारण्यासाठी चित्राचा मध्यभाग न निवडता, थोडेफार तपशील असलेला परंतु दुय्यम महत्त्वाचा असा एखादा थोडासा बाजूचा / कोपऱ्यातला भाग निवडल्यास बहुधा अधिक उपयुक्त ठरावा.

एखाद्या कोपऱ्यात शिक्का मारल्यास चोरी करणाऱ्याने चित्राचा तेवढा भाग कातरून टाकून (क्रॉप करून) उरलेले चित्र चोरण्याचा धोका तरीही राहतोच. परंतु मधोमध शिक्का मारून आपलेच चित्र विद्रूप करण्याच्या (माझ्या मते 'डोकेदुखी झाल्यास शिरच्छेद करावा' किंवा 'वेळू राहिला नाही तर बासरीही वाजणार नाही' छापाच्या) 'उपाया'पेक्षा ते बरे, असे वाटते.

तसेही चित्राच्या अगदी कडेला शिक्का मारण्याऐवजी चित्राचा मध्यभाग आणि कड यांच्या मधोमध कोठेतरी थोडाफार तपशील असलेल्या भागात शिक्का मारल्यास (१) चित्र विद्रूप दिसणार नाही, शिवाय (२) शिक्क्याचा भाग कातरून टाकल्यास (क्रॉप केल्यास), तसे कातरल्यानंतर चित्राचा मुख्य विषय चित्राच्या मध्यभागी न राहिल्यामुळे चित्र थोडे एका बाजूला कलंडल्यासारखे (लॉपसाइडेड) (आणि म्हणूनच विचित्र) दिसेल, ज्यायोगे चोरी सफल झाली तरी चोरीचा परिणाम तितकासा दर्जेदार न राहिल्याने चोरीचा हेतू तितकासा साध्य होणार नाही, असे वाटते.

(डिस्क्लेमर: वरील विवेचनास 'छायाचित्रकलेत पूर्णपणे अनभिज्ञ अशा एका सामान्य वाचकाचे उत्स्फूर्त प्रतिकियेतून स्रवलेले स्वैर विचार' एवढेच महत्त्व देऊन, शक्य झाल्यास मिठाच्या खड्याबरोबर घ्यावे, ही विनंती.)