पुण्यास गेल्यावर शक्य तोवर टाळू नयेत* अशा जागांमध्ये (अण्णा बेडेकर आणि क्याफे गुडलकच्या जोडीला**) आणखी एका जागेची भर पाडून दिल्याबद्दल आभारी आहे.

*'आवर्जून जावे' असे म्हणणार होतो, पण,
(१) कोठल्याही गोष्टीला अतिरेकी ('सुपरलेटिव' अशा अर्थी) चांगले न म्हणण्याचा वचनदरिद्री स्वभाव आड आला, आणि
(२) तसेही फार क्वचित होणाऱ्या पुणेभेटीत प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे, तेव्हा जे शक्य नाही त्याबद्दल इतक्या ठामपणे का बोला? ('एकदा गेलात की नेहमी जात रहाल'लाही नेमका हाच - आणि केवळ हाच - आक्षेप आहे.)
(तसेही हल्ली पुण्यात 'आवर्जून जाण्या'सारख्या बऱ्याच नवनवीन जागा येऊ घातल्या आहेत असे ऐकून आहे. उदाहरणार्थ, स्टेशनाच्या - म्हणजे पुणे स्टेशनाच्या - मागील बाजूस कोठेतरी ढोले-पाटील रस्त्याच्या बाजूला, अमेरिकेतील काही उपाहारगृहांत जशी 'ऑलऱ्यू-कॅन-ईट बफे'ची पद्धत असते, साधारण तशाच धर्तीवर चारशेसाडेचारशे रुपयांत भरपेट, अमर्यादित आणि उत्कृष्ट कबाब मिळू लागले आहेत आणि तेथे एकदातरी आवर्जून जाऊन मनसोक्त हादडून यावेच, अशी शिफारस नुकतीच ऐकली. माणसाने कोठेकोठे म्हणून जावे?)

**या यादीत अनेक जण 'वैशाली'लाही गणतात. मात्र 'वैशाली' या प्रकाराबद्दल मला पूर्ण आदर असला, तरी 'एकदा तरी गेलेच पाहिजे'च्या माझ्या यादीत 'वैशाली' मोडत नाही. एक तर तेथे टोळक्याने जाण्यात खरी मजा आहे. आणि बरीच वर्षे पुण्याबाहेर राहिल्यानंतर पुण्यात सध्या माझे टोळके नाही. दुसरे म्हणजे 'वैशाली' या संस्थेशी माझा संबंध महाविद्यालयीन काळात न येता आयुष्यात बऱ्याच उशिरा, नोकरीच्या दिवसांत आल्याने, मी तेथे 'वाढलेलो' नाही. त्यामुळे तितकेसे आकर्षणही नाही.
'क्याफे गुडलक'शीही माझा संबंध आयुष्यात साधारणतः तितक्याच उशिरा आला असला तरी तेथे हा आक्षेप लागू नाही. कारण,
(१) 'क्याफे गुडलक'ला टोळक्याने जावे लागत नाही, एकट्यादुकट्याने जाऊनसुद्धा - किंबहुना एकट्यादुकट्याने जाऊनच! - मजा येते. (अपवादः संध्याकाळच्या वेळी टोळक्याने चहा आणि मस्कापाव मारायला मजा येऊ शकते. पण जेवायला एकट्यादुकट्यानेच जावे.)
(२) 'क्याफे गुडलक' आवडण्याकरिता तेथे 'वाढण्याची' फारशी गरज नाही. आणि,
(३) तशीही नोकरीत जी काही फार थोडी वर्षे मी पुण्यात घालवली, त्या काळातले माझे दुपारच्या जेवणासाठी बऱ्याचदा 'क्याफे गुडलक'मध्ये पडीक असणे जमेस धरता तेथे मी काही काळापुरता का होईना, पण 'वाढलो' असा दावा जर मी केला, तर तो फारसा चुकीचा ठरू नये.