मुळात लग्न हीच कल्पना आहे आणि त्यातूनच सर्व नाती निर्माण होत असल्यामुळे ती सगळी काल्पनिक आहेत. लग्न करावे किंवा नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो प्रत्येकजण लग्नाकडे कसे बघतो त्यावर अवलंबून आहे. पण तुम्हाला जर लग्न हा पर्याय दोघांना सफल व्हावा असे वाटत असेल तर ती कल्पना आहे हे आगदी मनोमन पटायला हवे नाहीतर ते ओझे होते.
आता तुम्ही जर असा दृष्टीकोन ठेवणार असाल :
'लग्न म्हणजे नव्या जीवनाची आपण पाहत आलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेली सुरवात. मनासारखा जोडीदार मिळाल्यावर त्याच्या साथीने सर्व आशा पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेला प्रयत्न'.
तर ते सहजीवन फार जीकिरीचे होईल. 'मी तुझ्या इच्छा पुरवते तू माझ्या पुरव' यातून भावनिक कलह निर्माण होतो. त्यापेक्षा 'माझे असे म्हणणे आहे तुला पटते का बघ' यातून संवाद सुरू होतो, एकमेकात पारर्दशकता येते, एकमेकांचा फायदा करून घेण्यापेक्षा, दोघांच्या उपभोगाची आणि प्रयत्नाची दिशा समान रहाते.
'मोठ्यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या माझ्या आयुष्याची सुरवात शिव्याशापाने झाली आणि ते देखिल माझ्याच माणसांच्या हे मी कसे विसरू शकेन...... एकमेकांची तोंडेही न बघण्याची शपथ घेणारे हे नातेवाईक कदाचित पुढे या शपथा मोडतीलही एकत्र येतीलही पण त्यांनी आधी बोललेल्या शब्दांचे तिखट घाव आयुष्याच्या कोपऱ्यात नेहमी दुखत राहतील.'
एकदा सर्व नाती ही काल्पनिक आहेत हे पटले तर हा त्रास लगेच संपेल. प्रत्येक प्रसंगाचे आपले विश्लेशण हे आपल्यावर त्याचा काय परिणाम होणार या दृष्टीकोनातून असते. जर तुम्ही तुमच्या निर्णयाची पूर्ण जवाबदारी घेतली तर तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. पण पूर्ण जवाबदारी म्हणजे पूर्ण जवाबदारी! जोपर्यंत आपला दुसऱ्याला दुखवण्याचा हेतूच नाही तोपर्यंत त्याच्या गैरसमजाची जवाबदारी सर्वस्वी त्या व्यक्तीवरच असते.
आता '...पण त्यांनी आधी बोललेल्या... ' हा शुद्ध, स्वतःला कायमचे दुखः देणारा विचार आहे. जर तुम्ही स्वतःच्या सुखाची जवाबदारी घेतली नाही तर प्रसंग काहीही घडो, तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही. संजय