ज्येष्ठ गजलकार प्रदीप कुलकर्णी यांच्याबाबत मला मनापासून आदर आहे. त्यांच्या गजलांमध्ये एक हळुवारपणाचे फीलिंग देणारी शब्दरचना व त्यातही 'जन्म चकव्यासारख्या' सारख्या अनेक गजलांची मेजवानी असते. प्रदीर्घ काळाच्या व्यासंगानेच ते शक्य आहे. त्यांच्या या रचनेबात व त्यावरील चर्चेबाबत मात्र माझी मते खालीलप्रमाणे आहेत.

१) माझा सर्वात पहिला आक्षेप हा आहे की स्वतः वर्षात जेमतेम एखादी गजल झळकावणारे एखाद्या दिग्गज समीक्षकाच्या थाटात जोरदार मतप्रदर्शन करतात हे नवोदीत लोकांसाठी अत्यंत दिशाभूल करणारे आहे. मैदानात यावे, आपले उत्पादन प्रदर्शनास ठेवावे व नंतर काय ते बोलावे. तसेच, कवींची समीक्षा कवींनीच करावी, अभ्यासकांनी एकमेकात चर्चा केलेली बरी पडते.

२) कविता व गजल यातील फरक आपल्यासाठी खास देत आहे. भटसाहेबांचे जे मराठी भाषेवर उपकार आहेत त्याबद्दल बोलण्याची माझी कुवतसुद्धा नाही हे आधीच मान्य करतो. पण त्यांनी लिहिलेल्या बाराखडीचा व प्रस्तावनेतील काही विधानांचा बाकीचे जसा पुळचटपणे उपयोग करून इतरांना ज्ञानामृत पाजतात ते अत्यंत विस्मयकारक आहे. पाहा फरकः

पकडून उन्हाचा हात... निघालो आहे!
भेटेल मलाही रात... निघालो आहे! - हे एक सपाट विधान आहे. भजनात असते तसे. यात भावनांची तीव्रता, दुसऱ्या ओळीत पहिल्या ओळीचा प्रभावी समारोप, कलाटणीयुक्त शब्दरचना, नाट्यमयता यातील एकही किंवा एकाहून अधिक अश्या कोणत्याही गोष्टी नाहीत.

प्रत्येक समुद्रातील परीला द्याया...
घेऊन फुले मी सात निघालो आहे! - हा संदिग्ध शेर आहे. ज्यांना संदर्भ माहीत नसेल त्यांना समजणारच नाही. तसेच, हेही एक सपाट विधान आहे. 'मी समुद्रातील प्रत्येक परीला देण्यासाही सात फुले घेऊन निघालो आहे' असे! विधानांना वृत्तात बसवल्यानंतर आशयाचा जो एक जबरदस्त पंच प्रदीप यांच्या काही शेराम्मध्ये आढळतो तसा इथे अजिबात जाणवत नाही.

होईल शहाणे कोण कुणाच्या मागे?
मी ठेच तरीही खात निघालो आहे! - आणखीन एक सपाट शेर! ही सरळ सरळ बातमी आहे. यात कवीच्या भावना न दिसता काय घडत आहे हे कळत आहे.  

रंगेल सुखांचा छान विडा रंगावा...
घेऊन व्यथांचा कात निघालो आहे! - आपल्या 'हूल' सारखा शेर आहे हा. बाकी काही सांगत नाही.

माझे न कधी कळणार कुणाला गाणे...
मी मौन स्वरांनी गात निघालो आहे!  - आणखीन एक बातमी!

संपून तरी जाईन तिथे मी, किंवा -
-होईल नवी सुरुवात... निघालो आहे! - हाही विधानात्मक शेर आहे. मी संपेन किंवा नवी सुरुवात होईल.

घेऊन समाधी दुःख कधी का संपे...
मी हेच बघाया आत निघालो आहे!! यात मात्र पहिल्या ओळीत लक्षात येत नाही की दुसऱ्या ओळीत कवी काय म्हणणार आहे? हा नक्कीच गजलेचा शेर आहे. ( माझा असा अंदाज आहे की हा शेर सर्वात पहिल्यांदा सुचला असावा. पण हा अंदाज अनावश्यक आहे. )

गजलेमध्ये आशयातील व्यवहारीपणा व कल्पनाविलासाचे बेमालुम मिश्रण, रुपके/प्रतिमा/उपमा यांचा खुबीने वापर, कलाटणी, नाट्यमयता, भावनांची तीव्रता, हळुवारपणा, संवादात्मकता, व्यथा, प्रेम, भावनांचा उल्लेख यातील अनेक गोष्टी एकाच वेळेत विविध प्रमाणात उपस्थित असतात. कवितेमध्ये हे सारे 'अनावश्यक' असते. असले तर ठीक, पण नसले तरी निसर्गवर्णनाच्या कविता वगैरे टिकून राहतात. पुलस्तिंचा एक वरवर सामाजिक वाटणारा शेर आहे, मात्र तो सामाजिक नाही.

त्यातील सानी मिसराः

'प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही'

यात त्या बिचाऱ्या म्हादूचे प्रगतीच्या लाटेत नुकसान झाले अशी सामाजिक जाणीव नसून 'म्हादू' या रिप्रेजेंटेटिव्ह व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक जागा असणे याचे निदर्शक आहे. पण ते मांडणे व जाणवणे या दोन्ही कला आहेत.

गेले काही दिवस इथे लोक कवितेबद्दल व गजलेबद्दल चुकीचे बोलत नसून फक्त 'आपल्यापेक्षा वेगळी मते मांडत आहेत. '

( बाकी: अजय: किती लोक अशा कविता लिहू शकतील हे विधान मात्र टाळले असते तरी आपल्याला मतप्रदर्शनात काही अडचण आली नसती असे मला वाटते. दिलखुलासपणे हे वाक्य घ्यावेत.)

आपल्याही नवीन गजलेच्या मनापासून प्रतीक्षेत.