A] जोडीदारातील काय महत्वाचे?
१. फक्त गुणवत्ता QUALITY [ प्रेम विवाह ]
२. फक्त विश्वासार्हता RELIABILITY [ आयोजीत विवाह ]
३. दोन्हीचा सुवर्णमध्य QUALITY + RELIABILITY[ आयोजीत प्रेमविवाह ]
४. तीसरेच काहीतरी. [ दानव / यक्ष / गंधर्व...... विवाह. ]
हा ज्याच्यात्याच्या वैयक्तिक निर्णयाचा भाग आहे असे वाटते.
B] शर्यतीत जिंकणार्या घोड्यांचे कृत्रीम रेतन करताना २/४ पिढ्या मागील " वंशाचा व यशापयशाचा " विचार केला जातो. [ युजेनेटीक्स].
हे घोड्यांच्या बाबतीत काटेकोरपणे करणारा मनुष्य प्राणी स्वत: किती घटकांचा विचार करून स्वत:ची वा इतरांची लग्ने ठरवतो?
सर्वप्रथम, हे उदाहरण घोड्यांच्या कृत्रिम रेतनाबद्दल आहे हे गृहीतक उदाहरणात स्पष्ट आहे. त्यामुळे त्याची तुलना विवाहाशी होऊ शकेलच असे वाटत नाही. किंवा होऊ शकल्यास अशा तुलनेतून इतरही काही "शास्त्रशुद्ध अनुमाने" निघू शकतील, जी आपल्या पचनी पडण्यासारखी (येथे 'डिझायरेबल'ला योग्य मराठी प्रतिशब्द चटकन आठवला नाही.) असतीलच, असे वाटत नाही.
(नैसर्गिक परिस्थितीत घोडे स्वेच्छेने इतका काटेकोर विचार करत असतील असे वाटत नाही.)
विवाह करण्यामागचा हेतू जर घोड्यांप्रमाणे माणसाचे 'ब्रीडिंग' (मराठी?) करणे एवढाच असेल, तर कदाचित अशा तुलनेस काही जागा आहे. परंतु विवाह करण्यामागे एवढाच हेतू आहे असे वाटत नाही. त्याहूनही मोठ्या काही गोष्टी विवाहात अभिप्रेत किंवा अंतर्भूत असाव्यात असे वाटते. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे (जसे, काही अनुवांशिक किंवा जनुकीय दोषांतून उद्भवणारे दुर्धर रोग संततीस होण्याची शक्यता कमीत कमी ठेवण्यासाठी, वगैरे, आणि तेही पूर्णपणे ऐच्छिक तत्त्वावर) युजेनेटिक्सला येथे जागा आहे असे वाटत नाही.
(भावाबहिणीत किंवा अगदी जवळच्या रक्ताच्या नातलगांत विवाहास कायद्याची किंवा रूढींची आडकाठी हे कदाचित युजेनेटिक्सच्या अशा मर्यादित आणि ग्राह्य उपयोगाचे उदाहरण मानता यावे. )
विवाह हा मानवाच्या कृत्रिम रेतनाचा प्रकार आहे का हे ज्यानेत्याने ठरवावे.
वंशात विशिष्ट गुणांचे संवर्धन हा विवाहाचा एकमेव किंवा प्रमुख उद्देश आहे असे वाटत नाही. (तसेही नेमक्या कोणत्या गुणांचे संवर्धन हे कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवायचे हा प्रश्नच आहे. आणि एवढे करूनही यशाची शंभर टक्के खात्री नसतेच.)
राष्ट्राच्या उन्नतीसाठी युजेनेटिक्स वापरून एक यशस्वी वंश निर्माण करण्याबाबत थोडाफार विचार यापूर्वी युरोपात हिटलर नावाच्या एका सद्गृहस्थाने केला, असे ऐकिवात आहे. आणि अशा प्रकारे वंशनिर्मिती करताना यशस्वितेच्या कसोटीस न उतरलेल्या नगांचे काय करावे, याबद्दलही या सद्गृहस्थाचे विचार उद्बोधक आहेत, असे कळते. कृपया माहिती मिळवता आल्यास मिळवून ते पटतात का, ते पाहावे.
वंशाची "यशस्विता" वाढवणे आणि त्यातून सर्वस्वी "यशस्वी" किंवा "निर्दोष" वंश निर्माण करणे हाच जर मानवी विवाहाचा उद्देश असेल, तर त्या "यशस्विते"च्या किंवा "निर्दोषते"च्या कसोटीस आपण किंवा मी, दोघेही शंभर टक्के उतरत नाही, अतएव या निकषाप्रमाणे या पृथ्वीतलावर जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार आपणा दोघांनाही (किंबहुना बहुधा या भूतलावरील कोणाही मानवाला) नाही, एवढेच या मुद्द्याच्या समाचाराचा समारोप करण्यापूर्वी सुचवावेसे वाटते. तथापि, वरील निकषाप्रमाणे जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नसूनसुद्धा जिवंत राहण्याचा वैयक्तिक निर्णय मी घेतला आहे. आपल्याला योग्य वाटेल तो वैयक्तिक निर्णय आपण खुशाल घ्यावा.
C] एकूण कार्यसिद्धी:
१. कार्याकार्य विचार २. कार्यापुर्व विचार ३. कार्य कर्तव्य
१. स्थीती २. सावधान ३. कर्म
१. लाईटस २. कॅमेरा ३. ऍक्षन
१. स्टान्स २. एम [नेम धरणे] ३. शूट----- अमेरीका उपग्रह प्रक्षेपण नीती ---ध्येय उशिराने पण संपूर्ण. ३६० अंशात्मक. [ उदा: धर्म + अर्थ + काम + मोक्ष ]
१. स्टान्स २. शूट ३. कंटिन्युअस एमींग---- रशिया उपग्रह प्रक्षेपण नीती. --- ध्येय लवकर पण अपूर्ण. [ उदा: फक्त काम-- अश्वासीत, इतर अनाश्वासीत. ]D] "क्ष" प्रमेय व "य" प्रमेय----- व्यवस्थापनशास्त्र.
कुशल व्यवस्थापक तोच, जो तारतम्याने, दोन्ही प्रमेयांचा सुवर्णमध्य साधून " कंटींजंट" मार्ग निवडतो.
व्यवस्थापनशास्त्रातल्या अवजड संज्ञा* ("जार्गन") फेकून (तर्कबिर्क किंवा सारासार विचार वगैरे नसत्या भानगडी गुंडाळून ठेवून) काय वाटेल त्या निष्कर्षाप्रत येता येते अशी एक धारणा होती. त्यात काही तथ्य असावे अशी खात्री पटू लागली आहे.
*किंबहुना संख्याशास्त्रीय आकडेवारी (स्टॅटिस्टिक्स), व्यवस्थापनशास्त्रातल्या संज्ञा आणि इतिहासातले दाखले या तीन संकल्पना केवळ याच हेतूपोटी जन्माला आल्या असाव्यात अशी शंका आहे.
E] सज्जनांचे, पुण्यवंतांचे आशिर्वाद /शुभेच्छा / शिव्या / शाप, फळतातच.
शुभकार्यारंभी काय घ्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे.
'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' अशी काहीशी एक मराठी म्हण या निमित्ताने आठवली.
असो.