------ धन्यवाद. अशी अपेक्षा करणे म्हणजे, श्रीकृष्णाला गीता सांगतानाच ती " सार्थ, सोदाहरण व सस्पष्टिकरण सांग " असे म्हणणे होय. [ मी श्रीकृष्ण मुळीच नाही, अर्थ वस्तुनिष्ठतेने घ्यावा. ] त्यामुळे गौण मुद्दा महत्वाचा व मुख्य मुद्दा गौण ठरण्याची शक्यता वाढते.
मी भगवद्गीता वाचली नसल्याकारणाने या मुद्द्याचे सखोल विवेचन करू शकत नाही, परंतु गीतेबद्दल जी काही थोडीफार त्रोटक ऐकीव माहिती माझ्याजवळ आहे, त्या माहितीच्या आधारावर, रणभूमीवर किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाच्या मनातील शंकांचे निरसन करून त्याला कृतिशील करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यास गीतेचा उपदेश केला, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
ज्याअर्थी अर्जुन त्यानंतर लढला, त्याअर्थी त्या उपदेशाचे चीज झाले असे मानावयास जागा आहे. आणि या उपदेशाचे चीज होण्याकरिता मुळात तो उपदेश अर्जुनास समजणे, आणि त्याकरिता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास तो व्यवस्थितपणे, आणि गरज पडल्यास सोदाहरण आणि स्पष्टीकरणांसहितदेखील, समजावून सांगितलेला असणे हे तर्कास धरून असावे असे वाटते.
त्याहीपुढे जाऊन, तो उपदेश मुळात भगवान श्रीकृष्णांना स्वतः समजलेला असणे हे केवळ तर्कास धरूनच नव्हे, तर अत्यावश्यक असावे असे वाटते.
असो.
उदा: माझ्या " विवाह विश्लेषण :........ " या प्रतीसादात, क्वॉलिटी, रीलायबीलीटी, दानव/यक्ष/ गंधर्व विवाह पद्धती, उपग्रह प्रक्षेपण नीती, कृत्रीम रेतन, युजेनीक्स इत्यादी संज्ञा, संकेत, संकल्पनांचे विग्रह करत बसलो तर मुख्य मुद्द्याचे काय होईल? प्रतीसाद रटाळ होइल की रसपुर्ण?
विवेचनात प्रस्तुत मुद्द्याशी असंबद्ध संकल्पना न आणल्यास त्यांचा विग्रह करण्याची आवश्यकता भासणार नाही असे वाटते.
किंवा आणायच्याच झाल्या, तर अण्वस्त्रनियमनकरार, वैश्विक उष्मावृद्धी, चलनफुगवटा, भरताचे नाट्यशास्त्र, चिनी सूचिवैद्यकातील ('ऍक्युपंक्चर'च्या मराठीकरणातून मराठीच्या शब्दसंपदेच्या वृद्धीस हातभार लावण्याचा आमचा हा माफक प्रयत्न!) 'यिन' आणि 'यांग'चा समतोल, उष्मागतिकीचे (थर्मोडायनॅमिक्स!!!) नियम, प्राचीन इजिप्शियन राजवंशांतील मृतदेहांच्या संवर्धनाची प्रक्रिया आणि जपानी हायकू याही संकल्पना आणल्या असता प्रतिसाद अधिक रसभरित होईल असे सुचवावेसे वाटते. (संबंध काय, कसाही लावता येईल.)
प्रतीसाद रटाळ होइल की रसपुर्ण?
प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर संकल्पनाविग्रहाच्या या अतिरिक्त आकर्षणाविनासुद्धा, केवळ असंबद्ध संकल्पनांच्या भांडवलावर प्रतिसाद रटाळ न होता भरपूर मनोरंजन होते, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. त्यातसुद्धा शुद्धलेखनाच्या नियमांच्या कल्पक वक्रीकरणामुळे अधिकच बहार येते. जणू काही दुधात साखरच!