आंतरजालावर या संकेतस्थळांनी मराठी आणले तरी त्यांचा उद्देश त्या त्या संकेतस्थळाची भरभराट व्हावी असा होता का खरोखरच मराठीची भरभराट व्हावी असा होता? उदा. अनेकदा मनोगतावर इथले सॉफ्टवेअर मुक्तस्रोत करावे अशा मागण्या येऊनही मनोगतकारांनी ते टाळले. (त्यात काही धोरणाचा भाग असेल आणि चालक म्हणून तो त्यांचा निर्णय आहे). पण त्यामुळे नवीन संकेतस्थळ तयार करणाऱ्याना अडचण आली. यावर सगळ्यात पहिल्यांदा देवनागरीमध्ये मुक्तस्रोत सुविधा निर्माण करणाऱ्या ओंकार जोशींना विसरून चालणार नाही. त्यांनी कुणालाही फुकट देवनागरीत लेखन करता येईल अशी सुविधा निर्माण केली हा मराठी संकेतस्थळांच्या वाटचालितला मैलाचा दगड आहे.
मराठी ओपनसोर्स या याहू ग्रूपचे सभासद कुठलाही गाजावाजा न करता विविध सॉफ्टवेअरचे स्थानिकीकरण आणि मराठीत भाषांतर करत आहेत. मराठी संकेतस्थळांच्याही पलिकडेही आंतरजालावर मराठी आहे हे विसरून चालणार नाही.
आज द्रूपाल आणि गमभन प्रणालीवर अनेक मराठी संकेतस्थळे तयार होत आहेत. पण काही अपवाद वगळता मराठी संकेतस्थळांच्या चालकांपैकी कुणीही त्याना सापडलेल्या त्रुटी आणि त्यावरचे उपाय परत मुक्तस्रोत समाजाला दिलेले दिसत नाही. सगळ्यात पहिल्यांदा हा विचार मिलिंद भांडारकर यानी इथेच मनोगतावर मांडल्याचे आठवते.
आज गमभन आणि द्रूपल यांना दिलेले योगदान (इश्यू क्यू) पाहिले तर लोकायत. कॉम, मायबोली.कॉम यासारख्या मोजक्याच संकेतस्थळांनी आपआपल्या परीने हे मुक्तस्रोत समाजाचे ऋण फेडायचा प्रयत्न केलेला दिसतो. माझे स्वतःचे संकेतस्थळ चांगले चालावे म्हणून लठ्ठालठ्ठी चालू असताना या संकेतस्थळांनी सगळ्याच मराठी संकेतस्थळाना फायदा व्हावा म्हणून केलेले प्रयत्न, ही बदलती मानसिकता हा नक्कीच आंतर्जालावरील मराठीचा एक मोठा टप्पा ठरावा.
संदर्भः
गमभन (लोकायत+मायबोली) दुवा क्र. १
मायबोली + ड्रूपल दुवा क्र. २
याहू मुक्तस्रोत मराठी ग्रूप दुवा क्र. ३