जुन्या मराठीत आदरणे हे (आढळणेच्या धर्तीवर) क्रियापद होते. त्याची काही रूपे जुन्या काव्यात सापडावीत. आधुनिक मराठीत हे क्रियापद नाही, आणि आदर करणे हा प्रयोगही नाही. हे हिंदीतील वापराचे मराठीत केलेले भ्रष्ट भाषान्‍तर आहे. परंतु, कदर करणे सारखाच अनादर करणे हा प्रयोगमात्र मराठीत होतो. हा अनादर व्यक्तीचा किंवा भावनेचाही असू शकतो. तद्वतच, विदग्ध मराठीत मान करणे हाही चुकीचा प्रयोग आहे.  मानपान करणे, मानसन्मान,मानमरातब करणे, मान ठेवणे/राखणे/संभाळणे हे योग्य.  आदर दाखवणे/बाळगणे परंतु मान/सन्मान/मानमरातब दाखवत/बाळगत/ठेवत नाहीत. अभिमान दाखवतात/बाळगतात, 'दाखवतात' हे मिरवतात अशा वाईट अर्थाने, तर बाळगतात हे 'मिरवत नाहीत' अशा चांगल्या अर्थाने. 'गर्व' हा फक्त व्ह्यायचा/करायचा (नसतो), दाखवणे-बाळगणे तर सोडूनच द्या.