आदर या शब्दाचा मान, सन्मान एवढाच अर्थ घेतल्यामुळे मूळ लेखिकेचा आणि त्यावर प्रतिसाद देणाऱ्यांचा गोंधळ झालेला दिसतो आहे. शुद्ध मराठी यांनी लिहिल्याप्रमाणे काव्यांत, विशेषत; मोरोपंताच्या काव्यांत आदरणे हे क्रियापद अनेकदा येते. तसे ते लीळाचरित्रातदेखील आले आहे. पण या सर्व ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ 'स्वीकार करणे' असा आहे. सांप्रत मराठीतसुद्धा, आदर करणे त्याच अर्थाने येते. देणगीचा/भेटवस्तूचा/धनादेशाचा आदर म्हणजे स्वीकार करतात. व्यक्तीचा मात्र आदर केला जात नाही. याउलट, अनादर माणसाचा करता येतो किंवा भेटवस्तूचा!
मराठी भाषा आणि तिच्यातले संकेत यांच्यावर कितीही चर्चा केली तरी ती अपुरीच आहे. ते एक न संपणारे प्रकरण आहे.--अद्वैतुल्लाखान