जादुचे दिवस

  एकोणिसशे  पन्नासच्या सुमारास,  पुणे  म्हणजे जवळपास,   थोडेफार  सुधारलेले असे एक खेडेगावच होते..  बहुतेक  ठिकाणी,  कधी  काळी डांबरीकरण केलेले व आता पूर्णपणे दुर्दशा झालेले खड्डेवजा रस्ते,  मिणमिणते  दिवे व रस्त्यावर मुख्यत्वे सायकली व टांगे यांची वर्दळ,  यामुळे  शहरीकरणाचे वारे फारसे कोठे दिसत नसत.   नाही  म्हणायला कसबा, रवीवार  वगैरे काही पेठा आणि मुख्यत्वेकरून कँपाचा भाग मात्र शहरी वाटत असे.  भांबुर्डा  स्टेशनवरून टांगा केला की " जंगली  महाराज रस्त्यावरून घे."  असे  पुणेकर मोठया अभिमानाने सांगत असत. .