गद्य - भाषेतील व्याकरणाचे नियम पाळून लिहिलेली / लिहिलेल्या ओळी, ज्यात कर्ता, कर्म, क्रियापद व शब्दांचा क्रम हा सर्वमान्य, अर्थ समजण्याजोगा, सुस्पष्ट असून त्यात उपमा, प्रतिमा, रुपके यांचा वापर नसला तरीही चालतो व जे सांगायचे आहे ते त्याच शब्दात सांगीतले जाऊ शकते. गद्यामध्ये आयुष्यातील सर्व बाबींवर भाष्य करता येतेच.

पद्य - ( यात 'काव्य' या शब्दाची मला वाटत असलेली व्याख्याही समाविष्ट करत आहे, मात्र माझ्यामते 'काव्य' व 'पद्य' हे आमूलाग्र भिन्न आहेत.) सांगीतिक नियमांप्रमाणे जी शब्दरचना उच्चारता येऊ शकतेच ( गेयता ), ज्यात नाट्यमयता, अतिशयोक्ती, विरोधाभास, तीव्रतायुक्त विधाने, सौंदर्ययुक्त शब्दरचना, रसोत्पत्ती, सर्वसमावेशकता, निर्मीती, नावीन्यपूर्ण दृष्टीकोनाचे अस्तित्व, हेतूपुरस्पर असलेली अस्पष्टता, अर्थाचे स्तर, रीती, वक्रोक्ती अशा बाबी कमी अधिक प्रमाणात असून त्या शब्दरचनेची जगाला उपयुक्तता असते, त्यातून दृष्टीकोन मिळू शकतो व जे सहज लक्षात राहू शकते.

मुक्तछंद - गद्य वा पद्याचे कोणतेही व्याकरणाचे नियम न पाळता मनातील विचार व्यक्त करणे. मुक्तछंदही गाता येतो हे सिद्ध करणारी एक सी डी माझ्याकडे आहे, मात्र त्यात गायकाची त्रेधातिरपीट उडालेली स्पष्ट कळत आहे. कर्ता, कर्म, क्रियापद याचे कुठलेही नियम पाळण्याची आवश्यकता नसणे, गेयतेचा कृत्रिम भास असला तरीही प्रत्यक्षात गेयता नसणे ही मुक्तछंदाची वैशिष्ट्ये आहेत.

माझ्यामते, कवी कितीही श्रेष्ठ आला तरीही मुक्तछंद ही कविता नाहीच.

 तेव्हा आपण वर दाखल्यादाखल दिलेल्या नावांपैकी ज्या ज्या रचना मुक्तछंदातील आहेत त्या कविता नाहीत.

मला मुक्तछंद व छंदमुक्त यातील फरक माहीतही आहे व तेच तेच अनेकवेळा मी ऐकलेलेही आहे. माझा एक प्रश्न आहे. एखाद्या पुस्तकात किंवा इतरत्र कुठे 'मुक्तछंद' म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे काय?

गजल म्हणजे काय याची व्याख्या आहे.

काव्य म्हणजे काय याची व्याख्या आहे.

गद्य म्हणजे काय याची व्याख्या आहे.

व्याकरण म्हणजे काय हे लिहीलेले आहे.

मुक्तछंद म्हणजे काय हे कुणी कुठे लिहिलेले आहे काय?