भूषण,

माझ्याकडे 'वृत्ते आणि अलंकार' (लेखक डॉ. वि. म. कुलकर्णी) हे पुस्तक आहे, त्यात मुक्तछंदाबद्दल माहिती दिलेली आहे. अर्थात मला ती माहिती त्रोटक वाटली.

माझ्या आठवणीप्रमाणे (मी '८९ मध्ये दहावी उत्तीर्ण झालो) आमच्या आठवी ते दहावीपैकी एका वर्षी व्याकरणाच्या पुस्तकात मुक्तछंद होता. दुर्दैवानं मला त्यातली व्याख्या नीट आठवत नाहीये.

माझ्या समजुतीप्रमाणे मुक्तछंद हा छंदाचा (म्हणून पद्याचा आणि काव्याचा - यात मी तरी फरक मानत नाही) प्रकार आहे; पण यात वृत्त / छंद अगदी ढोबळपणे येतात. उदा. चार ओळींचं एक कडवं घेतलं तर त्यात पहिल्या दोन ओळींतल्या मात्रा सारख्या असतील, पण तिसऱ्या आणि चौथ्या ओळींतली अक्षरं सारखी असतील. पुढच्या कडव्यात कदाचित सहा ओळी असतील आणि पुनः त्यांत मात्रा किंवा छंदाच्या दृष्टीनं वेगळेपणा असेल. छंदाचे नियमही थोडे शिथिल झालेले असतील. (ओवीमध्ये कधी कधी होतात तसे - म्हणूनही मुक्तछंद हा एक छंदाचा प्रकार आहे.). उदा. एका ओळीत आठ अक्षरं, तर दुसऱ्या ओळीत सात किंवा नऊ असू शकतील. थोडक्यात, संपूर्ण कवितेचा विषय एक असेल, पण कडव्यांच्या रचनेत साम्य असेलच असं नाही.

कुसुमाग्रजांचं वाक्य (ज्ञानपीठ मिळाल्यावर दूरदर्शनवरच्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं ते) 'मुक्तछंद हा एक छंद आहे, अनेक कवी छंदमुक्त लिहितात', तेही माझी ही समजूत होण्यास कारणीभूत आहे.

मी अजून तरी मुक्तछंदात कविता करायचा प्रयत्न केलेला नाहीये याचं कारण मला ही समजूत चूक की बरोबर ते (शक्य झालं तर शाळेतल्या व्याकरणाच्या पुस्तकाला शोधून) तपासून बघायचं आहे.

- कुमार