विविध वृत्ते कशी चालतात यावर लिखाण आहे. गजल तांत्रिकदृष्ट्या कशी असते यावर लिखाण आहे. अभंग, ओवी, लावणी, भावगीत यात काय तंत्र येऊ शकतात किंवा येतात किंवा यावीत यावर (माझ्यामते) लिखाण असावे.

आपण मुक्तछंदाच्याबाबतीत ( मुक्तछंद हा कविता म्हणून 'रद्द' होऊ शकतो या विचाराच्याबाबतीत ) भावनाशील झाला आहात.

मुक्तछंद म्हणजे काय ते आपण तरी सांगावेत अशी विनंती.

आपल्या या गजलेतील शेराचे उदाहरण घेत आहे.

विकत मिळते सावली
कोण झाडे लावतो?

( मुक्तछंद व गजल यातील फरक दाखवून मुक्तछंद म्हणजे 'पद्यहीन लिखाणाला कविता म्हणण्याचे स्वातंत्र्य' आहे हे सिद्ध करण्यासाठी कुठलाही शेर घेतला जाऊ शकेल. पण मी व तुम्ही चर्चा करत असल्यामुळे आपल्या दोघांच्या शेरांतील एक घ्यावा असे वाटले. )

या शेराचा मला समजलेला अर्थः

आजच्या काळात / जगात / संस्कृतीत , प्रेम / माणूसकी / आस्था / मदत वगैरे पैसे दिल्यावर मिळते. त्यासाठी उगाच कशाला मुद्दाम लोकांशी चांगले वागत बसायचे? ( ही एक व्यथा / निराशा / टीका असावी, कवीला आलेल्या अनुभवांमधून निर्माण झालेली. )

आपल्या या दोन सुंदर ओळींच्या या शेरात एक कहाणी सामावलेली आहे.

आता हाच विचार जर मुक्तछंदात मांडायचे ठरवले तरः ( कसलेच बंधन नाही हे मान्य करून )

माझ्या बाळा,
आज तुला आलेत पंख,
घेता येतीय एक भरारी
बघता येतीय हीच धरती
एका उंचीवरून
...
पण
आठवतंय तुला?
माझ्या पाठीवर घोडा घोडा करायचास ते?
आठवतंय?
हे पंख कसे वापरायचे हे मी शिकवले ते?

तुला कशाला आठवेल?
तुला आहेत आज तुझ्या दौलतीला पाहून भूलणारे दोस्त,
तुझ्या गाडीवर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या मैत्रीणी
तुला आहे आज दैवाने लाभलेले तारुण्य, जे कधी माझे होते

आज वृद्धत्व माझे आहे
पण ते माझे मित्र आहे
कारण मी लावले होते झाड
प्रेमाचे झाड
सगळ्या माणसांमध्ये
तुला या विकतच्या सावल्या फार काळ नाहीरे लाभणार

वगैरे वगैरे

अशा पद्धतीने एकाच वाक्यापुरता किंवा दहा पाने भरतील इतका 'मुक्तछंद (? )' कितीही फुगवता, आटवता येतो. त्याला यमके असोत, नसोत, मात्रांवर बंधने असोत, नसोत, अक्षरांच्या संख्येवर बंधने असोत, नसोत, ती कविताच आहे हा अट्टाहास केविलवाणा वाटतो.

त्यात काव्यमय विचार, खोल अर्थ वगैरे सारे काही असू शकेल, पण ते पद्य नाही. ( पुन्हा कुपया वाचा, पद्य व काव्य वेगळे. )

'मुक्तछंद' या अनाकलनीय, अगम्य, अतर्क्य 'शब्दरचनेला' भाषेचा ( गद्य व पद्य नंतरचा ) तिसरा प्रकार म्हणून मान्यता मिळावी, ज्यात कसलेही बंधन नाही परंतु
ते पद्य मात्र नाहीच नाही.