कवी हा इतर माणसांपेक्षा फक्त याच बाबतीत वेगळा असतो की त्याला एक संवेदनशील मन लाभलेले असते जे आवर्तनप्रधान व्यक्तीकरण करू शकते.
( संवेदनशील मन लाभलेली प्रत्येक व्यक्ती कवी असेल असे नाही याचे कारण त्याच्या उक्तीचे व्यक्त स्वरूप गद्य आहे की पद्य यावर ते ठरते. )
जगात घडणाऱ्या / बघितलेल्या / ऐकलेल्या / वाचलेल्या / अनुभवलेल्या अनंत गोष्टींचा त्याच्या कवीमनावर परिणाम होत असतो.
याला आघात, प्रघात, परिणाम, प्रभाव काहीही म्हणता येईल.
गद्य हा भाषेचा 'आघात-प्रधान' प्रकार आहे.
पद्य हा भषेचा 'आवर्तन-प्रधान' प्रकार आहे.
जसे एखादा नर्तक झोपलेला असताना त्याची नृत्यकला जाणवू शकत नाही, परंतु त्याला उठवून 'नृत्य कर' असे सांगीतल्यावर तो करू शकतो व तेव्हा ती कला जाणवते तशीच कवीच्या कवीमनामध्ये एक शक्ती निद्रिस्तावस्थेत असते, तिचे नाव प्रतिभाशक्ती!
ही प्रतिभाशक्ती अनुभुतींच्या आघातांनी जागृत होते. जागृत झाल्यानंतर ती आवर्तन-प्रधान मार्गाने व्यक्त होते. आवर्तन-प्रधान मार्ग म्हणजे 'नैसगीकरीत्या छंदामध्ये व्यक्त होणे' किंवा 'नैसर्गीकरीत्या छंदामध्ये व्यक्त व्हावेसे / करावेसे वाटणे'.
यातून जी विविध प्रकारची नादमय आवर्तने निर्माण होतात त्यांना छंदशास्त्रातील छंद म्हणून स्वीकारले जाते व त्याचे पुस्तक तयार केले जाते.
यावरून लक्षात यावे की कविता निर्मीती ही नैसर्गीक प्रक्रिया आहे. ठरवून कवी होणे शक्य नाही.
कवी अनिल, पु. शि. रेगे., विं दा, मुक्तिबोध हे कवी अत्यंत शुद्ध छंदोबद्ध रचना करूनही मुक्तछंदाकडे वळण्याची कारणेः
जेव्हा आपली अनुभुती सर्वमान्य छंदात ( मात्रावृत्त / गणवृत्त / अक्षरछंद ) परिणामकारकरीत्या किंवा नेमकेपणाने मांडणे अशक्य होते तेव्हा वृत्त / छंद यात एक शैथिल्य घेतले जाते. हे शैथिल्य एखाद्या अक्षराचे. एखाददोन मात्रांचे असे असते. मुक्तछंदाची निर्मीती अशी होते.
यावरून एक गोष्ट मान्य व्हावी की काही अनुभुती मांडण्यासाठी छंद अपुरे पडतात किंवा तत्क्षणी कवीला छंदापेक्षा नेमक्या अर्थाची मांडणी जवळची वाटते.
इथे कवीच्या प्रतिभाशक्तीच्या मर्यादांचा प्रश्न येतो. प्रतिभा ही आवर्तन-प्रधान असल्यामुळे तिला छंदाव्यतिरिक्त इतर माध्यमातून व्यक्त होणे मान्य नसते पण ते मान्य करावे लागते. ( आवर्तन-प्रधान म्हणजे ध्वनिसाधर्म्याची ओढ असणे / नादसाधर्म्याची ओढ असणे. ) अजूनही अशी डेव्हिएशन्स ही कविच्या मर्यादा म्हणून मान्य नसली तरीही ती मर्यादाच असतात. यामुळेच मुक्तछंद हा मर्यादीत प्रतिभाशक्तीचा आविष्कार असतो. त्यात पद्य + काव्य यातील 'पद्य' या विभागाकडे दुर्लक्ष करण्याचा मोह, अगतिकता, कंटाळा या गोष्टी येतात.
पण, मूळ छंदात काही किरकोळ डेव्हिएशन्स करणे हे 'एकंदर 'पद्य + काव्य' यांच्या मिश्रणाच्या मनावरील अंतिम परिणामावरून' मान्य करायचे किवा नाही हे रसिक ठरवतो ( जर रचना प्रकाशित केली तर ) आणि त्यावरून तो मुक्तछंद बस्तान बसवायला लागतो.
यात रसिकाच्या प्रतिभेच्या मर्यादाही कारणीभूत ठरतातच.
पण आजकालः
मुक्तछंदाचा वापर कसा होतो ते लिहीत आहेः - एकंदर शैथिल्याला पूर्णपणे सर्वव्यापी करून एखादी शब्दरचना करणे हा उद्योग 'मशरूम'कवी करतात. यात कसलेच कष्ट नसतात. कसलाच 'पद्य-विधिनिषेध' नसतो. फक्त एक आटापिटा असतो की याला कविताच म्हणा!
काही किरकोळ बदल जे 'ध्वनिसाधर्माच्या फारसे आड येत नाहीत' ते करणे हे चालवून घेतले जाणारे डेव्हिएशन असून पूर्णतः छंदाची उचलबांगडी करणे हा कवितेच्याबाबतीतील अक्षम्य गुन्हा आहे.
ज्यात छंदाचा काही म्हणजे काहीही भास होत नाही तो 'मुक्त' का असेना, 'छंदच' कसा?
याच कारणासाठी मुक्तछंदाला कविता मानण्यास माझा नकार आहे.
धन्यवाद!