वाईट गजल म्हणजे कविता किंवा चांगली कविता असे मला म्हणायचेच नाही.

गजल व कविता यातील फरकः

१. कविता उलगडू शकते , गजल नाही.

२. कविता गजल - तंत्र पाळेलच असे अजिबात नाही, गजल मात्र गजल तंत्र पाळतेच.

३. कवितेत एका कडव्यात कितीही ओळी असू शकतात, गजलेचा शेर हा दोनच ओळींचा असतो.

४. कवितेच्या लांबीबाबत काही कायदे अभिप्रेत आहेत किंवा नाही माहीत नाही, गजलेत मतला धरून किमान पाच द्विपदी असाव्यात हा नियम पाळला जातो.

५. कवितेत कुठलाही विषय घेतात. गजलेतही कुठलाही विषय घेतात, मात्र ( हे पुन्हा माझे वैयक्तिक मत आहे की ) गजलेत शक्यतो अनुभुती घ्याव्यात. प्रेम, व्यथा, संवादात्मकता, नाट्यमयता, खुलवण्यापुरती अतिशयोक्ती, कलाटणी, विरोधाभास, संकेत, रुपके यांनी गजल नटणे हे अभिप्रेत असते असे अनेक गजला वाचल्यावर जाणवावे. कवितेत निसर्ग, देव, शाळा, नातीगोती, प्राणी, याप्रमाणे अक्षरशः कुठलाही विषय घेता येतो. फक्त मुलगा, निसर्ग, आपले गाव अशा एवढ्याच एकमेव विषयावर असलेली गजल मी तरी वाचलेली नाही. एखादा शेर असणे वेगळे. हां! आता कुणी रदीफच समजा दिल्ली अशी घेतली ( जसे मागे मी 'पुणे' ही रदीफ घेतली होती. ) तर ती तांत्रिकदृष्ट्या गजल ठरणारच. पण माझे असे मत आहे की त्याला गजल म्हणू नये. उदाहरणार्थः

एखाद्या गृहिणीला जर घरातील पाळलेला कुत्रा अत्यंत इमानदार, व माया करण्यालायक वाटत असेलः

खूपच निष्ठा पाळत आहे , अमुचा कुत्रा
सारे घर सांभाळत आहे, अमुचा कुत्रा

साधी पोळीसुद्धा माने गोड बिचारा
मासे, मुर्गी टाळत आहे अमुचा कुत्रा

शेजारी कुत्री होती, परक्याची झाली
भग्न मनाला जाळत आहे, अमुचा कुत्रा

हेच कळेना आम्ही त्याला पाळतोय की?
आम्हाला तो पाळत आहे, अमुचा कुत्रा

आता यात 'आळत' हा काफिया झाला, 'आहे अमुचा कुत्रा' ही रदीफ झाली. 'आ' ही अलामत झाली. मात्रा प्रत्येक ओळीत समान आल्या ( असाव्यात, मी मोजल्या नाहीत, आत्ताच सुचलेले उदाहरण आहे. ) तांत्रिकदृष्ट्या ( अजून एक शेर वाढवता येईलच म्हणा ) ही गजल झाली.
पण हे काव्य गजल म्हणून स्वीकारणे योग्य आहे का? बर! आता मी याला 'चांगली कविता' तरी म्हणतोय का? तर नाही. कारण त्यात पद्य असले तरीही काव्य काहीच नाही. नुसतेच 'कुत्रा-वृत्त' आहे. ( कुत्रा वृत्त हे या वृताचे नामकरण केले नसून इथे वृत्त हा शब्द 'बातमी' या अर्थाने घ्यावा. )

तेव्हा 'वाईट गजल' म्हणजे कविता असे मी कुठेही म्हंटलेले नाही.

एखादी रचना 'गजल' नसून 'कविता' असणे या विधानाचा नेमका अर्थः

त्यात ( ज्या शब्दाचे इथे प्रचंड विडंबन झाले आहे तो शब्द ) 'गजलियत' असणे आवश्यक आहे.

स्व. सुरेश भटांनी मराठीला नुसतीच 'निर्दोष गजलेची' तंत्रासकट भेट दिलेली नाही तर त्यात खरीखुरी गजलियत आणली असे तज्ञ म्हणतात व ते मला समजलेही आहे व मान्यही आहे.

उदाहरण -

गजल!

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

यातील दुसरी ओळ हे गजलियतचे ( व त्यामुळे शेरच ) अत्यंत उत्तम उदाहरण आहे.

कविता!

कापऱ्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

यात नुसतीच प्रणयाची , मीलनाची आकांक्षा आहे. ( अर्थातच या रचनेचा समावेश 'कविता' या सदरात झाला आहे. )

आपण ज्या रचनेबाबत वरील प्रतिसाद दिला आहेत, ती रचना आता पुन्हा एकदा या दृष्टीकोनातून पाहवीत अशी विनंती आहे. यात त्या रचनेच्या मूळ कवीला उद्देशून काहीही लिखाण नाही, खरे तर त्या कवीच्या गजलांमुळे अनेकांना गजल करण्याची स्फुर्ती मिळाली असावी. पण, तरी ती विशिष्ट रचना 'गजल' या दृष्टिने मागे पडते व अर्थातच त्याचा अर्थ असा नाही की कविता ही गजलेपेक्षा कमी दर्जाची असते.

धन्यवाद!