जर दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरू असतील तर पुस्तकात तसा उल्लेख असावा. जर ते महाराजांचे गुरू नसल्याचे सिद्ध करणारे ठोस पुरावे मिळाले तर तो उल्लेख काढून टाकावा. या गोष्टीला जातीपातीचे निकष लावू नयेत.

या भागाशी पूर्णपणे सहमत.

मेटे वगैरे लोक मूर्ख आहेत असे वाटते. निष्कारण दोन जातींमध्ये असलेली भांडणे वाढवण्याचे काम चालू आहे.

'मूर्खपणाखाती घालण्याजोगे द्वेषाखाती घालू नये' ('नेवर अट्रिब्यूट टू मॅलिस दॅट विच कॅन बी अडिक्वेटली एक्स्प्लेन्ड बाय स्टुपिडिटी') असा मर्फीच्या नियमावर बेतलेला एक नियम ऐकलेला आहे. आपले पहिले विधान त्या प्रकारातले (आणि पुष्कळच सौम्य) वाटले.

दुसऱ्या विधानातील 'निष्कारण' हा शब्द वगळल्यास उर्वरित विधानाशी सहमत. असे प्रकार निष्कारण कधीही होत नाहीत असे वाटते. कोणाची ना कोणाची पोळी अशा प्रकारांत भाजली जातेच जाते.

मात्र क्वचित्प्रसंगी आग लावणारा आणि पोळी भाजून घेणारा यांचा परस्परसंबंध किंवा संगनमत नसणे शक्य असू शकते, एवढेच. आग लावणारा केवळ आग लावण्याच्या कलेच्या प्रेमापोटी आग लावू शकतो आणि पोळी भाजून घेणाऱ्याची भूमिका केवळ युटिलिटेरियन (मराठी?) - वाहत्या गंगेत हात धुणाऱ्याची - असू शकते. मात्र एकंदर प्रकार पूर्णपणे 'निष्कारण' कधीही होत नाही असे वाटते.

इथे एक अजून सांगावेसे वाटते की बाबासाहेब पुरंदऱ्यांचेही लेखन मला संशोधन प्रकारचे वाटले नाही. शेजवलकरांचे काही लेखन वाचल्यानंतर पुरंदरे हे इतिहासकार नसून कादंबरीकार आहेत असे वाटू लागले.

पुरंदऱ्यांचे लेखन फारसे वाचले नसल्याकारणाने यावर सविस्तर मत मांडू इच्छीत नाही, परंतु जे काही थोडेफार कधीकाळी वाचले आहे किंवा त्याबद्दल ऐकले आहे, त्यावरून पुरंदरे हे इतिहासकार म्हणण्यापेक्षा ऐतिहासिक कथाकार असावेत असे वाटते.

तसेही आपण इतिहासकार असल्याबद्दल खुद्द पुरंदऱ्यांनी कधी कोणता दावा केल्याचे निदान माझ्या तरी ऐकण्यात आलेले नाही.

अर्थात ऐतिहासिक कादंबरीकार असण्यात काही गैर असावे असेही वाटत नाही. ऐतिहासिक कथांद्वारे इतिहासाचा वारसा लोकांना समजेल आणि रुचेल अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य ऐतिहासिक कथाकार, कीर्तनकार आणि पोवाडे गाणारे शाहीर निभावतात. मात्र ऐतिहासिक कथाकारप्रभृतींचा मुख्य उद्देश 'इतिहासाचे संशोधन' हा नसून 'कथा सांगणे' हा असल्याकारणाने त्यांच्याकडून अपेक्षाही काहीश्या वेगळ्या आणि मर्यादित स्वरूपाच्या असतात. ऐतिहासिक कथा या जरी ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेल्या असल्या, तरी मुळात ललितलेखन याच स्वरूपाच्या असल्याने सर्व बाजूंचा विचार करून 'पूर्ण सत्य' मांडण्याची अपेक्षा ऐतिहासिक कथाकाराकडून नसते. कथेस पूरक आणि कथानायकाची बाजू प्रभावीपणे मांडणाऱ्या तथ्यांवर भर देऊन इतर बाजूंचा विचार करणाऱ्या तथ्यांना गौण स्थान देण्याची मुभा ऐतिहासिक कथाकारास असते, तशी ती इतिहासकारास नसते. ऐतिहासिक कथाकथनात कथेच्या अनुषंगाने काहीशी एकांगी तथ्ये मांडलेली चालू शकतात, याउलट इतिहासकाराकडून सर्व बाजूंचा विचार करून पूर्ण चित्र मांडण्याची (थोडीशी उंचावलेली) अपेक्षा असते. (अर्थात किती इतिहासकार ती अपेक्षा पूर्णपणे निभावू शकतात याबद्दल कल्पना नाही, आणि तो मुद्दाही वेगळा.)

त्यामुळे ऐतिहासिक कथाकाराकडून शक्य तितके सत्यास धरून कथाकथनाची अपेक्षा जरी करता आली, तरी तो अखेरचा शब्द मानता येऊ नये, असे वाटते.

पुरंदऱ्यांची राजकारणी लोकांसोबत असणारी उठबस वगैरेही फारशी आनंददायी नाही.

याबाबत काही माहिती नसल्याकारणाने बोलू इच्छीत नाही.

त्यामुळे पुरंदरेंना त्या समितीवरून काढले त्याचा आनंद किंवा दुःख असे काही झाले नाही. मात्र ज्या पद्धतीने ते झाले त्याचे वाईट वाटले.

या विधानाशी सहमत.