मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मेटे, साळुंखे, श्रीमंत कोकाटे, पार्थ पोळके, हरी नरके, खेडेकर अशा मंडळींना घाऊक प्रमाणात मूर्ख वगैरे म्हणणे हा त्यांच्या प्रतिभेचा अपमान आहे, असे मला वाटते. या मंडळींची चळवळ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आहे. पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वपरंपरेने मराठा समाजाचे नेतृत्व लाभलेला भाग आहे. शेती, सहकारी व खाजगी कारखानदारी, शिक्षणसंस्था या प्रामुख्याने मराठा समाजाच्याच ताब्यात आहेत. तथापि महाराष्ट्राचे तथाकथित सांस्कृतिक नेतृत्व अद्याप कोल्हापूरला न जाता पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर येथेच घुटमळत राहिले आहे ( यात औरंगाबाद का नाही असा मुद्दा उपस्थित झाल्यास त्यावर मतप्रदर्शन न करण्याचा अधिकार मी राखून ठेवतो! ) पु. ल. देशपांडे कला अकादमीत कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर तिथले मिनी थिएटरही महिनोनमहिने मिळत नाही आणि शाहू सांस्कृतिक भवनातल्या लोखंडी खुर्च्या गंज खात पडतात हे उदाहरणार्थ सलण्यासारखेच आहे. काही विवक्षित क्षेत्रांमधील बिगरमराठा समाजाचे - म्हणजे स्पष्टच लिहायचे तर ब्राह्मण समाजाचे वर्चस्व हे सदरहू मंडळींच्या डोळ्यांवर येते आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजही स्वतःच्या नाकर्तेपणाने, कूपमंडुकी विचारांने आणि न बदलण्याच्या प्रवृत्तीने अशी फूट पाडण्यास अप्रत्यक्ष रीत्या मदतच करतो आहे. (ब्राह्मण मुलींनी आंतरजातीय विवाह करू नयेत, ब्राह्मणांनी संततीनियमन करू नये, शेंडी आणि जानवे हीच ब्राह्मण समाजाची खरी ओळख आहे असले ब्राह्मण महासंमेलनांतील उदाहरणार्थ ठराव, 'सनातन प्रभात' चा उदाहरणार्थ कोणताही अंक. त्यातून अगदी मूलभूत पातळीवर ऐदीपणाच्या बाबतीत मराठा समाजही ब्राह्मणांच्या तसूभरही मागे नाही. एकीकडे लघुरुद्र- एकादष्ण्या तर दुसरीकडे तांबडे-पांढरे रस्से, एवढाच काय तो फरक. ) त्यातून ब्राह्मणविरोधाचा छुपा अजेंडा असलेल्या शरद पवारांची राजकीय पीछेहाट होत असलेली आणि परंपरागत शहाण्णवकुळींना लोकसभा निवडणुकीत बिगरमराठा समाजाकडून बसलेले धक्के (निवेदिता(राजे) मानेंसारख्या घरंदाज पण तंतोतंत नाकर्त्या उमेदवाराला राजू शेट्टीसारख्या नवख्या बिगरमराठा उमेदवाराकडून उदाहरणार्थ पत्करावी लागलेली हार). त्यामुळे मराठा समाजाची नव्याने सहानुभूती मिळवायची असेल तर त्यासाठी 'ब्राह्मणविरोध' या मुद्द्याला पर्याय नाही हे मेटे आदींच्या बरोबर ध्यानात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि शक्य त्या पातळीवर ब्राह्मणविरोध ( 'भांडारकर तो झांकी है, शनिवारवाडा बाकी है' वगैरे) या दोनच मुद्द्यांवर मराठा समाजाच्या या पडद्यापुढील आणि पडद्यामागील सूत्रांना निदान विधानसभा निवडणुकीत सत्तेची एखादी रुंद लंगोटी मिळण्याची आशा आहे. अन्यथा चाळीस जागांची वल्गना करायची आणि हाती डझनभरही यायच्या नाहीत, अशी लोकसभेसारखी नामुष्की परत व्हायची. अहो, 'आता लोकसभा लढवणार नाही' म्हणून ऐटीत शस्त्रे खाली ठेवल्याला साहेबांना अब्रू वाचवण्यासाठी माढ्यात यावे लागले, आणी बारामतीची जागा कन्येला देऊन एक अधिक एक असे करावे लागले. आता मराठा समाजाचा ब्राह्मणांवर असलेला परंपरागत राग एवढे एकच शस्त्र मेटेंसारख्यांच्या हातात आहे. त्याचा असा वापर करणाऱ्यांना मूर्ख कसे म्हणता?