सर्वप्रथम, मूळ कथा सुंदर आहे, आणि भाषांतरही आवडले. भाषांतरात वापरलेल्या स्थानिकीकरणालाही तत्त्वतः विरोध नाही, पण...
...दुर्दैवाने भारतीय वातावरणात ही गोष्ट अशक्यकोटीतील वाटते.
एकंदरीत भारतीय टेलोफोन एक्स्चेंजेसच्या (मराठी?) - मग ती सरकारी असोत किंवा विविध भ्रमणध्वनीकंपन्यांसारखी खाजगी - आजवरच्या अनुभवावरून, एखादे लहान मूल आईवडिलांच्या अपरोक्ष टेलिफोनवर कोणताही नंबर फिरवत आहे हे लक्षात आल्यावर त्याच्याशी ऐसपैस गप्पा मारणे किंवा त्याच्या निरागस शंकांना उत्तरे देण्याचे कष्ट घेणे तर सोडाच, त्याच्याशी दोन शब्द नीट बोलण्याचे सौजन्य तरी पलीकडील ऑपरेटर दाखवेल की नाही, याबद्दल दाट शंका वाटते. बहुधा काहीही न बोलता फोन ठेवून देणे इतपतच कमाल सौजन्याची सर्वसाधारण अपेक्षा असावी.
(अमेरिकेत हे अजूनही काही अंशी शक्य असावे असे वाटते. आमच्या चिरंजीवांनी ते लहान असताना टेलिफोन हातात घेऊन वाटेल ते क्रमांक फिरवताफिरवता योगायोगाने आपत्कालीन सेवांचा ९११ क्रमांक फिरवून आपली अगम्य बडबड सुरू केली असता, पलीकडील पोलीस ऑपरेटरने त्यांच्याशी सौजन्यपूर्ण संवाद साधण्याचा किमान प्रयत्न तरी केल्याचे अनेक अनुभव गाठीशी आहेत.)
तशीही ही गोष्ट भारताच्या पूर्वेला घडली असल्याचे म्हटले असल्याने प्रस्तुत टेलिफोन ऑपरेटरला अरुणाचल प्रदेश नेमका कोठे आहे हे माहीत असणे अगदीच अशक्य नसावे, परंतु 'स्टेशन' हा शब्द इंग्रजीत कसा लिहावा हे यदाकदाचित माहीत असले तरी प्रस्तुत ऑपरेटरने ते आगंतुक कॉल करणाऱ्या एखाद्या लहान मुलास सांगणे, हे प्रेतातल्या वेताळाने विक्रमादित्यास दिलेली धमकी त्या मुलाने प्रस्तुत टेलिफोन ऑपरेटरला दिली असल्याशिवाय शक्य वाटत नाही.
अर्थात हा दोष अनुवादिकेचा नाही, परिस्थितीचा आहे. अशा परिस्थितीत एक तर अनुवाद न करणे किंवा प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेऊन जितका जमेल तितका प्रभावी अनुवाद करणे, एवढे दोनच पर्याय हाताशी उपलब्ध असतात. पैकी प्रस्तुत अनुवादिकेने पहिला पर्याय न स्वीकारता दुसऱ्या पर्यायास अंगीकारण्याचा प्रयत्न केला आहे, हे स्तुत्यच आहे. आणि प्राप्त मर्यादा लक्षात घेता अनुवाद चांगलाच झाला आहे, असे म्हणावेसे वाटते.