असले प्रसंग फक्त मराठी माणसांच्या वाट्याला येतात. त्यांना वाटते आपण बोलतो ती भाषा कुणाला समजणार नाही. कधीकधी ते 'च'च्या भाषेत बोलतात. ऐकणाऱ्याने त्याच भाषेत उत्तर दिले की फजिती ठरलेली. मराठी माणूस सोडला तर इतर लोक बहुभाषी असतात.
आम्ही रामेश्वराला गेलो होतो. त्यावेळी काही वेळासाठी आमचा गट फुटून आम्ही विखुरले गेलो. तिथे मला एक उत्तम मराठी बोलणारा मद्रासी भेटला; खरेदीसाठी स्वस्त आणि मस्त दुकाने दाखवतो असे म्हणत होता. इतके छान मराठी पुण्यात राहून शिकल्याचे त्याने सांगितले. जेव्हा आमचा गट परत एकत्र आला त्यावेळी प्रत्येकाला महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला शिकलेला एकएक मद्रासी माणूस भेटलेला होता. त्यानंतर त्यातल्या एका मद्रासी माणसाला मी बंगाली बोलताना पाहिले. तो बहुतेक, संभाव्य गिऱ्हाइकाला कलकत्त्यात राहून बंगाली शिकलो असे सांगत असावा. एकूण काय मराठी माणसाला धड मराठीही येत नाही, तो इतर भाषा काय बोलेल? आणि कुणाला आपली भाषा समजते असे कळाले की अचंबा करीत बसेल.