मला ही कथा/अनुवाद फार आवडला याचे विशेष कारण असें-

माझ्या लहानपणी जे टेलेफोन होते ते स्वयंचालित नव्हते. आपण रिसीव्हर उचलून कानाला लावला की
टेलेफोन ऑपरेटरचा आवाज कानीं पडायचा. आपण त्याला आपल्याला हवा तो नंबर सांगितला की तो जोडून
दिला जायचा. तेंव्हा गावही लहान असायचे आणि टेलेफोन धारकांची संख्याही कमीच. टेलेफोन ऑपरेटर गावातलेच.
ते बहुसंख्य टेलेफोन धारकांना व्यक्तिशः ओळखत असत. इतकेच नव्हे तर त्यांचे आवाजही त्यांच्या ध्यानांत असायचे. या
कथेत सांगितल्या प्रमाणे कुणी सामान्य माहितीही टेलेफोने ऑपरेटरला विचारली तर तो ती सांगतही असें. उदाहरणार्थ
एखाद्या रेल्वे गाडीचे किंवा बसचे वेळापत्रक माहिती नसेल आणि ती माहिती टॅलेफोने ऑपरेटरला विचारली तर तो ती
सांगण्यास अनमान करीत नसे. अशा "माहिती द्या" या सदरांत संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदया सुद्धां अनेक व्यावहारिक गोष्टी
असत. मला एकदा गृहपाठ करतांना ब्रम्हदेशाची राजधानी आठवत नव्हती तर ती मी आमच्या टेलेफोन काकांनाच विचारली
आणि त्यांनी ती सांगितलीही. अशा तर अनेक आठवणी आहेत. सगळ्या सांगायच्या तर एक स्वतंत्र कथाच व्हायची. एक मात्र
खरे की त्याकाळी टेलेफोनेचे यंत्राला एक प्रकारचा जिवंतपणा होता.