बहुतांशी लहान मुलांना १०० हा क्रमांक उपजत आवडतो (का कोणास ठाऊक ! ).
मला वाटते यात उपजत आवडीपेक्षा योगायोगाचा भाग अधिक असावा. म्हणजे एखादे माकड एखादा कळफलक अनंतकाळापर्यंत बडवत बसले, तर कधी ना कधी शेक्स्पियरचे समग्र वाङ्मय निश्चितपणे टंकून काढेल असे म्हणतात. (अवांतर: आमच्या प्रतिसादलेखनाबद्दलसुद्धा नेमके हेच म्हणावयास जागा आहे, याची विनम्र जाणीव आहे.) तद्वत एखादे लहान मूल (येथे नुकतेच बोबडे परंतु अर्थहीन बडबडू लागलेले लहान मूल अभिप्रेत आहे.) बराच वेळ फोनवरील आकडे दाबत (अथवा पूर्वीच्या काळी फिरवत) बसले असता कधी ना कधी १०० (किंवा ९११, किंवा ते मूल राहत असलेल्या परिसरातील आपत्कालीन सेवांचा जो कोठला क्रमांक असेल तो) फिरवण्याची शक्यता बरीच आहे. त्यातसुद्धा या नियमाच्या जोडीला मर्फीचा नियमही लक्षात घेतल्यास ही शक्यता १००% मानण्यास हरकत नसावी.
पूर्णविरामानंतर "आणि" ची योजना करणे हे मला अजूनही गोंधळवून टाकते. कोणीतरी खुलासा करेल तर बरे.
मी व्याकरणतज्ज्ञ नाही. परंतु माझ्या कल्पनेप्रमाणे तरी यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. (शेवटच्या वाक्यातील पूर्णविरामानंतरच्या "परंतु"च्या योजनेत जसे काही गैर नसावे, त्याप्रमाणे.)
बाकी वरील प्रतिसादातील आपल्या इतर मतांबद्दल आणि अनुभवांबद्दल "ज्याचीत्याची मते, आणि ज्याचेत्याचे अनुभव" एवढेच म्हणू शकतो. (इतर प्रतिसादकर्त्यांनी मांडलेल्या अनुभवांप्रमाणे कदाचित भारतातही, विशेषतः लहान शहरांत किंवा छोट्या गावांत, कधी काळी असे होऊ शकणे अगदीच अशक्य नसावे असे दिसते. अर्थात त्या काळी, विशेषतः लहान गावांत, टेलिफोन किती जणांकडे असत हा भाग वेगळा. परंतु तेव्हासुद्धा मोठ्या शहरांत, मोठ्या आणि व्यस्त एक्स्चेंजेसमध्ये असे होऊ शकत असेल यावर विश्वास ठेवणे अवघड वाटते.) अर्थात यात मतभेदास जागा आहेच. आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतीलही.
भारतात कॉल सेंटरचे कर्मचारी कदाचित अश्या परिस्थितीत उत्तरे देत नाहीत (कारण त्यांना कमाल संख्येने फोन घेण्याबद्दल पगार मिळतो)
अधोरेखित कारणापेक्षासुद्धा व्यक्तिनिरपेक्ष वृत्ती ('इंपर्सनल अटिट्यूड'चे हे मराठीकरण तितकेसे जमलेले नाही याची जाणीव आहे.) (आणि काही अंशी ग्राहकास सेवा देणे जेवढे म्हणून टाळता येईल तेवढे टाळण्याची आडमुठेपणाची वृत्ती) याला जबाबदार आहे असे वाटते. कॉलसेंटरे ही आजकालची गोष्ट आहे, परंतु एकंदरीत सरकारी कचेऱ्यांत (यात टेलिफोन एक्स्चेंजेही आली) ही वृत्ती काही नवीन नाही. (अर्थात क्वचित अपवादही पहावयास मिळत असावेतच.)