अभिप्रायाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
अर्ध्या ओळी- हा नाईलाज नसून, एक प्रयोग आहे. त्याचं काय आहे, मी लहान असतांना केशवसुतांची 'आम्ही कोण' ही कविता अभ्यासाला होती. शार्दूलविक्रिडीतातल्या या कवितेची सुरुवात अशी होती-
"आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके-
देवाचे, दिधले असे जग तये, आम्हास खेळावया... "
या ओळी त्यावेळी फार प्रभावित करून गेल्या. त्यातही दुसऱ्या ओळीचा अर्थ शोधतांना लक्षात आले, की तो 'देवाचे' शब्द वरच्या ओळीतला आहे. (आम्ही असू लाडके देवाचे!) तेव्हापासून असे काहीतरी लिहायचे मनात होते. पण योग येत नव्हता.
आणि एकदा असाच बसलो असतांना, 'कविता सुचत नाही' या विषयावरच कविता सुचू लागली. त्यात हा प्रयोग भरपूर वेळा केला गेला. अर्थात ही कविता म्हणजे त्या वेड्या क्षणाचा दस्तावेज आहे. याहून फार महत्त्व हिला नाही. बऱ्याच ठिकाणी वृत्त गेलेले आहे, याची जाणीव आहे.
हा प्रयोग असल्याने, त्याची फसण्याची शक्यता गृहीत धरली होतीच.
मात्र, आपणा सर्वांचे परखड अभिप्राय वाचून आनंद वाटला.
आपला (प्रयोगशील)
-शाहिस्तेखान.