दुसरे असे की सत्य कधीही दडपता येत नाही जे इतिहस घडवू शकत नाहीत तेच मग नैराश्याने जुना इतिहास बदलू पहातात. सहमत.
मुळात ब्राह्मण इतिहासकारांनी शिवरायांचा इतिहास चुकीचा लिहिला हा त्यांचा आरोपच चुकीचा आहे. ज्या ब्राह्मण इतिहासकारांनी शिवरायांचे गुरुत्व दादोजी कोंडदेवांच्या नावे लिहिले, त्याच इतिहासकारांनी शिवरायांवर संस्कार करण्याचे श्रेय जीजाबाईंना दिले. ज्या ब्राह्मण इतिहासकारांनी शिवरायांच्या अध्यात्मिक गुरुत्वाचा मान रामदासांना दिला, त्याच ब्राह्मण इतिहासकारांनी शिवरायांनी तुकारामांना आपल्या दरबारात मानसन्मानार्थ बोलावल्याचे शिवचरित्रात नमूद केले. ( येथे संत तुकाराम चित्रपटातील दृश्श्याप्रमाणे शिवराय स्वतः भेटायला गेले होते असे काही जण म्हणतील, पण तुकाराम गाथेत 'स्वामींनी छत्रपतींना पाठवलेले उत्तर' अशा शीर्षकाखाली " तुम्हापाशी आम्ही येवोनिया काय वृथा सीण आहे चालण्याचा..... " या अभंगाचा समावेश केला आहे. त्यामध्ये " मानाचिये आसे राजगृहा यावे, तेथ काय वसे समाधान? " असा प्रश्न विचारलेला आहे. ) ज्या ब्राह्मण इतिहासकारांनी नेताजी पालकर पळून मोगलांना जाऊन मिळाल्याचे लिहिले, त्यांनीच परत महमंद कुलीखान होऊन आलेल्या नेताजी पालकरला शिवरायांनी पावन करून घेतल्याचा उल्लेख केला आहे. असे अनेक प्रसंग दाखवता येतील की ज्यामध्ये ब्राह्मण इतिहासकारांची भूमिका विशिष्ट जातीच्या बाजूने वा विरोधात असल्याचे म्हणता येणार नाही. केवळ शिवचरित्राच नव्हे तर त्या बाहेरच्या इतिहासातची हे दिसते. ज्या राघोबावर अटकेवर झेंडे लावल्याचे श्रेय उधळले गेले, त्यालाच पुत्रासमान पुतण्याच्या हत्येचा पापी ठरविले गेले. ज्या बाजीरावावर मराठी राज्य नष्ट होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला गेला , त्यालाच (पाठ्यपुस्तकांमध्ये हा भाग नाही) वैद्यकाची व विज्ञानाची आवड असणारा म्हणून गौरविले गेले.
आणखी एक गोष्ट: इतिहास लिहिला गेला, त्या वेळी उपलब्ध झालेल्या पुराव्यांध्ये काही त्रुटी वा अपुरेपणा असू शकतो, मात्र जेथे इतिहासाची साधने इतिहास घडविणाऱ्यांनीच नष्ट करण्याचे उद्योग केले (उदा. नाना फडणीसांनी आपल्या मृत्युच्या आधीच कित्येक कागदपत्रे जाळून टाकली होती) त्या भारतासारख्या देशात इतिहास पुरतेपणाने कधीच सापडणार नाही. अशा वेळी उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांची पूर्ण चिकित्सा करून त्यावर विश्वास ठेवत अधिक पुरावे मिळविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. हे तर बाजूलाच राहिले, आपल्याकडे दुर्दैवाने इतिहासाकडे उथळ दृष्टीनेच अधिक पाहिले जात आहे. यात ना मराठ्याचा फायदा आहे, ना ब्राह्मणाचा.