"मराठी वाचवा - कोणती?" असं काहीसं शीर्षक असलेला निबंध शांता शेळके यांच्या "गुलाब काटे कळ्या" या पुस्तकात काही वर्षांपूर्वी वाचला होता. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल व विकासाबद्दल आस्था असलेल्यांनी अवश्य वाचावा असाच तो लेख होता. आज संगणकीय मराठी युगाचा उगम (व विकासही) झाला असल्यामुळे त्याबद्दल लिहिणं अप्रस्तुत ठरणार नाही.
मराठी वेबसाइटांवरील शितं वेचल्यावर भाताबद्दल जे ज्ञान झालं, ते शांता शेळके यांच्या उपंरोक्त निबंधात सांगितल्यापेक्षा फारसं वेगळं नाही. "उद्घाटन"ऐवजी "विमोचन", "साजरा होणे"ऐवजी "संपन्न होणे", इत्यादि वाक्प्रचारांचा भडिमार होत असल्याबद्दल शांताताईंनी त्यात लिहिलं होतं.
इंटरनेटवरील इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द सुचवताना तसंच होतंय असं मला ठळकपणे जाणवतंय. मराठीच्या नावाखाली संस्कृत शब्दांचा भडिमार होतोय. उदा. आंतरजाल, जालनिशी, इत्यादि. विरोप ह्या शब्दाचं मूळ मात्र समजलं नाही. हा शब्द शब्दबंधच्या सदस्यांच्या पत्रव्यवहारांअंतर्गत मीसुद्धा वापरला होता एकदा, पण मला तो पटला नव्हता. त्यापेक्षा "ई-पत्र" हा शब्द जास्त सुटसुटीत वाटतो.
मायबोलीवरील "वीकांत" हा शब्द मात्र मनापासून आवडला. वीक एंड या इंग्रजी शब्दाला मराठीत चपखलपणे रुजवल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. "वीकांत" हा धेडगुजरी शब्द वापरण्यापेक्षा "सप्ताहांत" हा शब्द जास्त सरस आहे असं कुणीतरी सुचवलं होतं, पण मी दुर्लक्ष्य केलं. सप्ताहांत म्हणजे "सप्ताह" आणि "अंत" यात इंग्रजी नसलं, तरी दोन्ही संस्कृत शब्दांपासून निर्माण झालेला हा शब्द (सगोत्र विवाहित दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या जनुकीय दोषयुक्त अपत्याप्रमाणे) मराठीला खिळखिळा करणारा वाटला.
संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, अर्धमागधी, पाली या सहा मूळ भाषांपासून जन्मलेल्या व फार्सी, अरबी व इतर अनेक भाषांच्या संस्कारांनी बाळसं धरलेल्या मराठीला संस्कृत शब्द भविष्यात गिळणार की काय, अशी भीती वाटते.
"संस्कृत ही भाषांची जननी आहे" किंवा भाषा गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ, पवित्र असावी, वगैरे गोष्टी मलाही पटतात.
गंगा नदी गंगोत्रीतून उगम पावते, तिला अनेक झरे सामील होतात व वाढत वाढत ती सतत पुढे जाऊन समुद्राला मिळते म्हणून ती नदी मोठी होते. त्याउलट उलट्या दिशेनं जर गंगोत्रीकडे ती वाहू लागली, तर गंगोत्रीतच लोप पावेल. दासगणू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "ओहोळ पोटी घे गोदावरी । म्हणुनी म्हणती तीर्थ तिला ॥" . तात्पर्य, मराठी प्रतिशब्द शोधण्यात काहीच गैर नाही. पण मराठी प्रतिशब्दांपेक्षा जर इतर भाषांमधल्या शब्दांचं मराठीकरण करता आलं, तर ते मराठीच्या भव्यतेचं एक प्रतीक होईल. नाही का?
(विषयांतर वाटलेला भाग वगळला : प्रशासक)