महेश, वासोख्त आणि व्याजोक्ती साधर्म्य केवळ उच्चाराचेच आहे. फारसीत सोख्तन ह्या क्रियापदाचा अर्थ होतो जळणे. वासोख्त म्हणजे कटू बोलणे ('जली कटी बातें सुनाना' साठी चपखल मराठी वाक्प्रचार हवा आहे.)
मराठी वाङ्मयकोशात व्याजोक्तीची व्याख्या "एखादी लपविलेली गोष्ट कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने उघडकीस आल्यानंतर अन्य मिषाने लपविण्याचा प्रयत्न जेथे केलेला असतो, तेथे व्याजोक्ती अलंकार होतो," अशी दिली आहे.
तुम्हाला कदाचित व्याजस्तुती ऐवजी चुकून व्याजोक्ती आठवले असावे. गल्लत झाली असावी. वाङ्मयकोशानुसार "बाह्यतः निंदा पण खरोखर स्तुती, किंवा बाह्यतः स्तुती पण खरोखर निंदा असे वर्णन जेव्हा केले असते, तेव्हा व्याजस्तुती अलंकार होतो. व्याजस्तुती या समासाचा विग्रह दोन प्रकारे होतो: (१) 'व्याजेन स्तुती'. या ठिकाणी व्याज म्हणजे किंवा बतावणी. निंदेच्या मिषाने केलेली स्तुती पहिल्या प्रकारात येते. (२) दुसरा विग्रह 'व्याजरूपा स्तुती'. येथे व्याज म्हणजे कपट. कपटाने केलेली स्तुती म्हणजे खरोखरी निंदाच. "