तुम्ही एवढा आग्रह केल्यामुळे आज सकाळी ह्यावर आणखी वेळ दिला. ज्यांना हे शिकण्यात रस आहे, त्यांनी ह्यात "भाग" घेतल्यावर ते समजणे अधिक सोपे व संयुक्तिक ठरेल.
वरील संरचनेची अभिसंरचना खालील प्रकारे:
१. माहिती चिकित्सा: वरील फ़्रेमवर्क वाचून, ज्याला वरील तक्त्यांचा वापर करायचा आहे, त्याने, ज्या माहितीची "चाचणी" करायची आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते- जे आपण नेहमीच करतो.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: तुमच्या कडे धड्यातील असा सारांश आहे की तो विद्यार्थासाठी महत्वाचा आहे. ह्यास आपण ज्ञानांश म्हणू या.
२. ज्ञान संपादन पातळी ठरवणे: त्यातील काय (तथ्ये, व्याख्या, संरचना, ई) चाचणायचं आहे हे ठरल्यानंतर, ते ज्ञानाच्या कोणत्या पातळीला चाचणावं लागणार आहे ह्याचा निर्णय घायचा. उदा. वरील लेखातील ज्ञानाची व्याख्या नुसती "आठवणे" पातळीपेक्षा "समजणे" पातळीवर चाचणे कमीत-कमी ध्येय (पहिल्या टप्प्याचे) असणे आवश्यक आहे. ते ज्ञान किती उंचीवर न्यायचे आहे हे त्या विषयाचा सर्व-साधारण आशय व विद्यार्थी ही माहिती का शिकत आहे हे पाहून ठरवावे.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: ज्ञानांश कोणत्या पातळीला संपादला पाहिजे हे निश्चीत असणे.
३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर ठरवणे: ज्ञानांशाची चाचणी ज्यापातळीला चाचणायची आहे त्याचा कठीणस्तर ठरवणे. (म्हणजेच ऍबस्ट्रॅक्टनेस ठरवणे) उदा. वरील लेखातील "ज्ञानाची व्याख्या" हा ज्ञानांश त्यातील प्रत्येक घटकाला शिक्षण उद्दीष्ट मानुन चाचणला हवाय की, ज्ञानाची व्याख्या हीच शिक्षण उद्दीष्ट मानायची आहे?- हे समजल्यास प्रश्न बनवणे सोपे जाते.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी (मराठी- कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स)
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वरील ३ पायऱ्या ह्यातील सर्वात महत्वाचा व वेळखाऊ भाग आहे. पण वरील भाग जर पारदर्शक असेल तरच पलिकडचे प्रश्न लख्ख दिसतील.
तसेच, वरील भाग कितीही पारदर्शक असला तरी, प्रश्नविकास हे एक कौशल्य आहे व ज्ञानसंपादनाचा सगळा डोलारा ह्या पायावर उभा राहतो.
४. ज्ञानपातळीचा प्रश्नतक्ता: वरील लेखात दाखवल्याप्रमाणे, एकदा तुम्ही ज्ञान संपादन पातळी ठरवली की, योग्य तो तक्ता निवडणे शक्य होईल. व प्रश्न लिहिण्यास सुरुवात करता येईल. प्रश्न विकास करतांना आपल्या मनात दोन गोष्टी घोळत राहिल्या हव्यात- शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी
वरच्या ज्ञानपातळीचा तक्ता निवडल्यास त्या खालील ज्ञानपातळीचासुद्धा वापरणे आवश्यक असते. म्हणजेच "समजणे" साठी "आठवणे" तक्ता हवाच.
आता एक उदाहरण घेऊन आपण ही पायरी पुर्ण झाल्याची खूण प्रत्यक्षात पाहू. मी वरील लेखाचेच उदाहरण घेऊन त्यातील ज्ञानांश घेतला आहे. त्याला काही अंदाज लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे-
१. ज्ञानांश: ज्ञानाची व्याख्या
२. ज्ञान संपादन पातळी: समजणे
३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर: माध्यमिक (तुम्ही हा कठीणस्तरतक्ता तुमच्या गरजेनुसार/अनुभवानुसार बनवा).
ह्यानुसार मी ज्ञानाची व्याख्याच शिक्षण उद्दीष्ट मानतोय. खालील स्तरावर मी व्याख्येतील प्रत्येक घटक एक वेगळे शिक्षण उद्दीष्ट मानले असते.
४. तक्ता: ज्ञान संपादन पातळी: आठवणे
ज्ञानपातळी: माहिती आठवता येणे
कोणते प्रश्न असावेत? कोणी, काय, कधी, कुठे, कसे, सांगा (उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा)
प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत? क्रियापदे: सांग, यादी बनव, समजाव, नातं सांग, शोध, लिही, नाव दे (काय म्हणतात ते सांग), व्याख्या सांग
उद्दीष्ट्य क्र. 01: ज्ञानाची व्याख्या
प्रश्न:
१. ज्ञानाची व्याख्या सांगा
२. ज्ञानाचे स्वरुप किती घटकांनी ओळखता येते? ते घटक कोणते ह्याची यादी बनवा?
३. ज्ञानाची प्रचलित व्याख्या कोणी लिहिली?
४. पुढील वाक्य पूर्ण करा: "चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने ..
५. एखाद्या माहितीचे फायदे/तोटे, चांगल्या/वाईट बाजू सांगता येणे ह्या ज्ञानस्वरुपाला काय म्हणतात?
६. "जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो", ह्यातील आधीच्या ज्ञानस्वरुपाच्या पायऱ्या कोणत्या?
७. "एखादी गोष्ट समजली की, ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते", खरे की खोटे?
८. आठवणे आणि समजणे ह्यातील फरक सांगा
९. नवनिर्माण म्हणजे काय?
वरील प्रत्येक प्रश्नाचे उद्दीष्ट ज्ञानाची व्याख्या आठवणे ह्या पातळीवर तपासली जाते. एव्हढ्या स्कॅफोल्डींगने पुढील प्रश्नतक्ता कसा तयार करता येईल हे समजेल. एकदाका वरील ज्ञानपातळीचे प्रश्न विचारुन झाले की, समजणे ज्ञानपातळीचे प्रश्न विकास करता येतील. त्याचे एकच उदाहरण देऊन मी हा प्रतिसाद संपवतो.
१. ज्ञानाच्या आणखी कोणत्या व्याख्या प्रचलित आहेत?- त्यांची उदाहरणे देऊन थोडक्यात लिहा.
२. ज्ञानाची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा.
३. ""शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत" ह्या परिच्छेदातील ज्ञानस्वरुपाच्या पातळ्या ओळखून दाखवा.
जाताजाता, वरील पद्ध्तीने प्रश्न तयार करणे हे सांगणे हा ह्या लेखाचा एकमेव हेतू नसुन मी शेवटी लिहिल्यानुसार, "पाठ्यपुस्तके, ३ टप्पे आणि शिक्षक" हा संपुर्ण भागही तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येकालाच कल्पकतेने किंवा अननुभवी असण्यामुळे, प्रशिक्षीत नसल्यामुळे प्रश्नविकास करता येईलच असे नाही. ते एक कौशल्य आहे. ह्या लेखाचा वरील सर्व बाबींवर प्रकाश टाकणे हा हेतू होता. शिक्षणक्षेत्रातील अनेक व्यक्तिंना ही पद्धत आधीच माहिती असेल व ते असे कामही करत असतील अशी माझी खात्री आहे कारण मी हे मुलभूत किंवा नवे संशोधन आहे असे मानत नाही. अनेक ज्ञात गोष्टींपासुन एक पद्धत सुचविण्याचा फक्त हेतू आहे.
तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जर अनेकांना ही संरचना कशी वापरावी हे समजल्यास अधिक कल्पक चर्चा करता येईल असे असेल तर त्याप्रमाणे ती अपेक्षा मी पुर्ण केली आहे. आता मात्र माझी अपेक्षा अशी आहे की, अशांनी ती त्यांच्या पद्धतीने वापरावी व येथे त्याची उदाहरणे द्यावीत. तुम्हीही ह्याचा वापर करुन पहावा व येथे तुमची फलश्रृती करावी.