मला तरी ही रचना थोडीशी 'विरहिणी' च्या अंगाने जाणारी वाटते.
म्हणजे, शेवटच्या कडव्यात त्याचा खुलासा होतो असे वाटते.
माझ्या कुवतीप्रमाणे अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. मीही हे पूर्ण पद आज पहिल्यांदाच वाचतोय... त्यामुळे चू. भू. द्या. घ्या.
(पहिल्या कडव्याचा स्वतंत्र अर्थ लागत नाही, ते दुसऱ्या कडव्याशी जोडून घेतले की अर्थ लागतो)
शत जन्म शोधिताना । शत आर्ती व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंती गाठी ॥
: एखादी स्त्री/ गौळण हे गीत गाते आहे असा विचार केला तर..
की मी शतजन्म.. अक्षरशः शतजन्म 'ह्या' ला शोधीत होते, त्यामध्ये शत आर्ती व्यर्थ झाल्या (प्रामाणिकपणे सांगतो, ह्याचा नीटसा अर्थ उमगला नाही) पण कदाचित, त्या शोधामध्ये 'आर्ती' म्हणजे दुःखे व्यर्थ ठरली, असा अर्थ असावा. आणि शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या...
एवढं सगळं झाल्यावर.. तेंव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी- म्हणजे, एवढं सगळं सोसल्यानंतर.. एक क्षणभर मला माझा 'प्रिया' भेटला, अगदी क्षणभरच. की जणू मी युगानुयुगे ज्या सुखाची/ सुखासाठी (अर्थात प्रियाच्या भेटीसाठी) साधना केली, त्या साधनेची, आणि सिद्धीची आज गाठ पडली, म्हणजे थोडक्यात ती साधना फळाला आली.
हा हाय जो न जाई । मिठी घालू मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखी हातचा सुटोनी ॥
ह्या कडव्यामुळेच मला ही विरहिणी वाटते, कारण त्यात ती गौळण 'सखी' ला सांगतेय की,
मी उठून त्याला मिठी घालू गेले, पण तोच तो एका क्षणात हातचा सुटोनी गेला.
- चैतन्य.