आज कोणत्याही मराठी माणसासाठी शिवरायांचे चरित्र व आदर्श परम वंदनीय आहेत. गेल्या अनेक पिढ्या शाहिरी पोवाडे, काव्ये, साहित्यातून शिवराय व त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या सर्व निष्ठावंत सेवकांना जणू देववत दर्जा मराठी माणसाने दिला आहे, व त्यात फार काही नवल नाही. परचक्राच्या, परकीय राजवट जुलुमांच्या तावडीतून लोकांना सोडवून न्यायाचे राज्य करणारे शिवराय कोणालाही तारणकर्त्यासारखेच वाटतील. त्यांच्या ह्या महान कार्यात त्यांना जीवाची बाजी लावून साथ देणारे, त्यांची निष्ठावंत चाकरी करणारेही आज लोकांच्या मनात प्रचंड आदराचे स्थान बाळगून आहेत. अशा श्रद्धेला एकाएकी दुर्लक्षित करून अचानक पाठ्यपुस्तककारांना जेव्हा 'वास्तवा'चा, 'सत्या'चा पुळका येतो तेव्हा त्या भूमिकेविषयी मनात नाना शंका येणेही स्वाभाविक आहे. असे तडकाफडकी पुस्तकी बदल घडवून आणण्यापेक्षा जर परिसंवाद, चर्चा, व्याख्याने इत्यादींच्या माध्यमातून सदर 'इतिहासकारांनी' पूर्वपीठिका तयार करून आपली भूमिका मांडली असती, प्रसारमाध्यमांतून चर्चा घडवून आणली असती तर ते अधिक योग्य, प्रमाण व लोकशाही मार्गास उचित ठरले असते. अशा प्रकारे लोकमनाला तयार करून जर पाठ्यपुस्तकात काही बदल घडवले तर त्याला काहीतरी आधार राहील. तडकाफडकी 'जागृती'चा आव आणून क्रमिक पुस्तकांमध्ये असे बदल म्हणजे वाद, गोंधळ व राजकारणाला जाहीर निमंत्रणच!

राहता राहिला ह्या सर्व प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप.... अहो, येथे मूठभर लोक सोडले तर कोणाला खऱ्याखुऱ्या इतिहासाचा कळवळा आहे? त्यामुळे राजकीय पक्षांचे आयतेच फावते. मराठी माणूस आपल्या इतिहासाविषयी कितीसा जागृत आहे? त्याला फक्त भावनेची साद कळते. त्याच्या भावनांना आव्हान दिले की त्याचे लक्ष काही काळ भ्रष्टाचार, महागाई, लोकसंख्या, अपुऱ्या सुविधा इत्यादी फुटकळ प्रश्नांवरून ढळते, एखाद्या संघटनेने त्याचे मत मांडले की त्या संघटनेविषयी ममत्व निर्माण होते, आपला आवाज कोणीतरी ऐकतय असा नाहक भ्रम त्याच्या मनाला सुखावून जातो..... आणि मग एकीकडे शिवाजीमहाराजांचे थोर दाखले देत लोकांची दिशाभूल करणारे राजकारणी आपापल्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार, मनगटशाहीचे साम्राज्य वाढवतच राहतात!

--- अरुंधती कुलकर्णी.