अनेक जणांनी बरोबर उत्तर दिलेले आहे, तरीही...
सर्वप्रथम, काही स्पष्टीकरणेः
मला सर्वप्रथम जेव्हा जाग आली, तेव्हापासून अंथरुणातून उठेपर्यंत त्यानंतर अधूनमधून मला पुन्हा झोप लागलेली नाही, केवळ आळसापोटी मी तसाच अंथरुणात लोळत राहिलो, दर अर्ध्याअर्ध्या तासाने एकएक टोला ऐकत राहिलो, आणि असे लागोपाठ चार वेळा झाल्यावर, माझ्या सामान्य अनुभवाप्रमाणे असे कधीही होणे मला अपेक्षित नसल्यामुळे मी चकित झालो आणि ताडकन उठून बसलो, हे मला वाटते कोड्याच्या मांडणीतून बऱ्यापैकी स्पष्ट आहे.
तसेच, 'एकाहून अधिक टोले ऐकले याचाही अर्थ एक टोला ऐकला, केवळ बाकीचे टोले विचारात घेतले नाहीत' अशा प्रकारचा कोणताही शब्दखेळ येथे अपेक्षित नाही. 'एक टोला ऐकला' याचा 'एकच टोला ऐकला' असा साधा सरळ अर्थ अपेक्षित आहे.
तर आता उत्तर:
मला जाग आली तेव्हा बारा वाजत होते. मात्र बारा वाजत असताना मी झोपेतून जागा होत असण्याच्या अवस्थेत असून, बारा वाजतानाचा शेवटचा टोला पडण्याच्या नेमक्या क्षणी मला जाग आल्यामुळे, पहिले अकरा टोले मी झोपेत असल्यामुळे ऐकले नाहीत; केवळ शेवटचा बारावा टोला मी ऐकला. त्यामुळे बारा वाजता उठताना मला एकच टोला ऐकू आला. हा पहिला टोला.
नंतर साडेबारा वाजता मी एक टोला ऐकला. हा दुसरा टोला.
नंतर एक वाजता मी एक टोला ऐकला. हा तिसरा टोला.
नंतर दीड वाजता मी एक टोला ऐकला. हा चौथा टोला. यावेळी मी चकित होऊन ताडकन उठलो.
म्हणजे माझी जागे होण्याची वेळ बारा वाजता (बाराचा शेवटचा टोला पडत असताना), आणि उठण्याची वेळ दीड वाजता.
अनेकांनी 'जागे होण्याची वेळ' आणि 'उठण्याची वेळ' यांत गल्लत केलेली आहे, मात्र अशांपैकी बहुतेक जणांची तर्कपद्धती बरोबर आहे.
'दुपारची वामकुक्षी' या शब्दप्रयोगातील चूक माझी; तेथे 'सकाळची वामकुक्षी' म्हणावयास हवे होते. 'वामकुक्षी' या शब्दाचा 'डाव्या कुशीवर आडवे होणे' असा शब्दशः अर्थ घेतल्यास, ती सकाळी घेतली तरीही 'वामकुक्षी' मानता यावी. परंतु नुसते 'वामकुक्षी' असे न म्हणता 'दुपारची वामकुक्षी' म्हणण्यात चूक झाली, हे मान्य.
तसेच माझा सकाळचा नाश्ता मी गाढ झोपेत असल्यामुळे टळला, असे मानावयास जागा आहे.