सुखी कुटुंबासाठी प्रेमविवाहच झाला पाहीजे असे नाही; पण विवाहोत्तर प्रेम मात्र असले पाहीजे, आणि शक्य तर ते वाढते पाहीजे.
आता, नवरा-बायकोचे सौंदर्य, आर्थिक बाजू, शिक्षण या बाबी संसारसुखाकरता कितपत आवश्यक आहेत ? या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते अतिशय सापेक्ष आहे, आणि ते नवरा-बायकोच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
एखाद्या पुरूषाला आपली बायको अतिशय सुंदर पाहीजे असेल, मग त्याकरता तो इतर बाबतीत तडजोडीला तयार असेल; तर एखाद्या स्त्रीला आपला नवरा अतिशय श्रीमंत पाहीजे असेल. मग त्याकरता त्याचे सामान्य दिसणेही ती चालवून घेईल. याउलट, जर एखाद्याला आपल्या जोडीदारातील बुद्धिमत्ता/स्वतंत्रपणा/प्रामाणिकपणा/सहानुभूती ई. गुण अधिक आवश्यक वाटत असतील तर ती/तो जोडीदाराच्या रुप/संपत्तीकडे दुर्लक्ष करेल.
जर आयुष्य शारिरीक/भौतिकदृष्ट्या समाधानाचे हवे असेल, तर आर्थिक बाजू भक्कम हवीच. पण जर नवराबायको एकमेकांच्या डोळ्यात बघत दिवसदिवस अन्नपाण्यावाचून काढू शकत असतील, तर ते आर्थिक स्थैर्याची फारशी फिकीर करणार नाहीत.
शिक्षणाचा उपयोगदेखील अजूनतरी सामान्यतः अधिक पैसे मिळवण्याकरता करण्यात येतो, त्यामुळे ईथेही वरीलच मुद्दा लागू आहे.
सारांश काय, की आपल्या जोडीदारात आपल्याला कोणते गुण पाहीजेत आणि का, कुठल्या गुणांकरता आपण तडजोड स्वीकारु शकू, हे स्वतःला पक्के माहिती पाहीजे. ते माहिती नसल्यास चिंतनाकरता भरपूर वेळ देऊन ते माहिती करुन घ्यावे. या ठिकाणी इतरांच्या उदाहरणांचा किंवा सल्याचा फारसा उपयोग होणार नाही, असे मला वाटते.