'नो पार्किंग' मध्ये लावलेल्या दुचाक्या अत्यंत कार्यतत्पततेने उचलणाऱ्या तरुण आणि तडफदार मुलांचे फार कौतुक वाटते. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता हर्क्युलसचे बाहुबळ दाखवून अशा दुचाक्या उचलणे, त्या मोटारीत किती जागा आहे याचा विचार न करता कोंबणे, तसे करत असताना दुचाक्यांचे काही नुकसान होते आहे का याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे आणि अशा दुचाक्या त्या त्या विभागातल्या पोलिस स्टेशनवर नेणे ... कोणत्याही जागरुक नागरिकाला अभिमान वाटावा अशी तडफ दाखवणारी ही मुले म्हणजे श्रमशक्तीच्या बळावर उद्याची महासत्ता होणाऱ्या भारताचे पोलादी आधारस्तंभच आहेत.
पण खरे नाट्य सुरू होते ते त्या त्या पोलिस स्टेशनच्या आवारात. तिथे दंडाची रक्कम स्वीकारणारा माणूस हा नेहमी चहा प्यायला गेलेला असतो. तो जागेवर असला तरी त्याच्याकडचे पावतीपुस्तक संपलेले असते. चुकून हे पावतीपुस्तक त्याच्याकडे असलेच, तर नियमानुसार दंड स्वीकारून पावती देण्याला तो नाखूषच असतो. त्याऐवजी काही 'तडजोड' करता आली, तर त्यासाठी बाकी तो उत्साही असतो. मग अशा तडजोडीतील काही वाटा त्या तरुण कार्यतत्पर मुलांकडे जातो, आणि तोंडातल्या गुटख्याची पिंक टाकून कानाला मोबाईलचे हेडफोन लावलेली ही उत्साही मुले पुढच्या दुचाक्या उचलायला त्या मालमोटारीला लटकून चालू लागतात.
नियम मोडणाऱ्या वाहानधारकांची बाजू घेण्याचा हा प्रयत्न नाही. जर उद्रेक होत असेल तर त्यामागची दुसरी बाजू कळावी हा उद्देश आहे.