हा विषय प्रचंड फिलॉसॉफिकल आहे.......... यावर (थोड्या वेगळ्या प्रकारे) मी आधी बराच विचार केला आहे - नेहेमीच करतो......... आणि त्याला उत्तर अज्जिबात न मिळता उलट मी टेन्स्ड होतो.......

फिलॉसॉफिकल विचार साधारण असे:-

एकदा सोसायटीच्या/बंगल्याच्या गच्चीवर उभे राहा. "मी" असा विचार करायला सुरूवात करा. "मी" "मंगेशच" म्हणजे थोडक्यात "मीच" का? माझ्या अजूबाजूला अनेक फ्लॅटस, बिल्डिंग्ज, सोसायटीज, मग शहर, मग राज्य, मग देश, मग जग आणि मग विश्व अशा असंख्य गोष्टी आहेत........ कित्तीतरी लोक...... त्यातला "मी" हा कित्ती किरकोळ घटक....... माझ्या असण्यानी कुणाला काय फरक पडतो सध्या आणि नसण्यानी काय फरक पडेल....... मी नव्हतोच तेंव्हा काय आणि कसं होतं?
पृथ्वीची उत्पत्ती ४०० कोटी वर्षांपूर्वी झाली असं शिकलोय..... मग त्याआधी काय होतं?? आणि या ४०० कोटी वर्षांमध्ये माझं अस्तित्त्व कुठे होतं का? असलं तर कुठल्या स्वरूपात? माझ्या मृत्यूनंतरसुद्धा हे जग असंच चालत राहणार हे सत्य आहे..... पण अशी किती वर्ष? मृत्यूनंतर माझं काय असेल? स्वर्ग आणि नरक हे प्रकार अस्तित्त्वात आहेत का? असतील तर मी कुठे जाईन? जिथे कुठे जाईन तिथे मला माझे पृथ्वीवरचे परिचित पुन्हा भेटतील का?
"पुनःर्जन्म" प्रकार खरंच असतो का? ८४ दशलक्ष योनींमधून जन्म घेतल्यानंतर माणसाला पुन्हा माणसाचा जन्म मिळतो असं म्हणतात..... मला पुन्हा पृथ्वीवर यायला मिळेल का? मिळालं तर पुन्हा त्याच देशात, त्याच कुटुंबात जन्म मिळेल का? आत्ता मी जिथे आहे ते खूपंच सुखवस्तू आहे(श्रीमंत लोकांशी तुलना न करता जे आहे तेवढं)..... पुढच्या जन्मात असंच असेल का? आणि ज्यांचा हाच जन्म असा वाईट (अपंगत्त्वामध्ये/गरिबीमध्ये) आहे त्यांचं कित्ती दुर्भाग्य? त्यांनी पुढच्या जन्माची स्वप्नं बघावीत का?
या सगळ्यासाठी "मृत्यू नसता तर किती बरं होतं" असं वाटतं....... पण "३०० आणि ४०० वर्ष जगत अकार्यक्षम राहण्यात कसलं आलंय जीवन? त्याचा काय उपयोग? " असंही वाटतं.....

याचं उत्तर फक्त येवढंच मिळतं की,
"पुढचं आणि मागचं कुणीही जाणत नाही,
स्वर्ग कसा आहे हे तिथे गेल्याशिवाय कळत नाही"....

मग असं वाटतं की यावर विचार करण्यात आणि वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? पण ते विचार आपोआप येत राहतात आणि भीती देऊन जातात....... भीती मरणाची नाही; या मरणानंतरच्या जगण्याची.....

संदीप खरेनी, "आयुष्य जगून झालेल्या आजी-अजोबांच्या भूमिकेतून" एक कविता लिहीलेली आहे.

कविता अशी :-

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पाहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥


मला कधी कधी ही कविता फक्त "त्या" आजी-अजोबांवरंच आधारित नसून माझ्यावर पण आधारित आहे असं वाटतं. माझ्यावर म्हणजे थोडक्यात फक्त वृद्धांवरंच आधारित नसून ज्यांचं अजून आयुष्य उपभोगून व्हायचं आहे त्यांच्यावरसुद्धा.... कारण दुर्देवानी हल्ली मृत्यूचं वय कमी-कमी होत चाललं आहे आणि मृत्यूची इतर कारणंही वाढलेली आहेत.... त्यामुळे "प्रत्येक क्षण हा शेवटचे हिरे-मोती वेचल्याप्रमाणे जगला पाहिजे" असं वाटतं मला कधी-कधी.....

(अपूर्ण. उरलेल्या भागात अतिरिक्त रोमन अक्षरे असल्यामुळे तो भाग प्रकाशित केलेला नाही. मनोगतावर लिहिताना इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही फिलॉसॉफिकल, फ्लॅटस, बिल्डिंग्ज, सोसायटीज इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलून कृपया पुन्हा प्रतिसाद लिहावा. कृपया सहकार्य करावे. : प्रशासक)