'सकाळ' हे एक निष्पक्ष वृत्तपत्र आहे ही गैरसमजूत सर्वत्र फोफावलेली दिसते. पाच वर्षांपूर्वी जेव्हा प्रताप पवार यांनी या वृत्तपत्रात दर रविवारी शरदस्तुतीस्तोत्रे लिहायला सुरुवात केली (कुठलीतरी आठवण काढायची आणि त्यात 'साहेबांचा' उल्लेख करायचा) तेव्हाच (आणि तेव्हापासून) वाचकांच्या लक्षात ही गोष्ट यायला हवी होती. किमान 'वृत्तपत्रविद्येतले जागतिक दर्जाचे विचारवंत' अभिजीत प्रताप पवार यांना जेव्हा 'सकाळ'ची सगळी सूत्रे सोपवली गेली तेव्हा तरी जागे व्हायचे?

विशिष्ट विचारसरणीची टिमकी वाजवायला वृत्तपत्र काढायचे असेल तर सरळ पुढे होऊन ते काढण्याची लोकमत-पुढारी-सामना-प्रहार या प्रकारची हिंमत न बाळगता परुळेकरांसारख्या खरोखरच्या निष्पक्ष माणसाने काढलेले वृत्तपत्र सगळे मार्ग-गैरमार्ग (गरजूंनी हिंमत असेल तर ही हकीकत खरोखर काय नि कशी घडली याचा शोध घ्यावा) वापरून परुळेकर कुटुंबियांकडून हिसकावून घेणाऱ्यांकडून 'निष्पक्ष'पणाची अपेक्षा बाळगणाऱ्यांचीच खरी चूक आहे.

सकाळचे संपादक गेल्या दहा वर्षांत कोण कोण झाले, आणि जे गेले ते का गेले याची जरा सविस्तर माहिती करून घेतली तर हे असले खुळचट प्रश्न पडणार नाहीत. विजय कुवळेकरांसारख्या माणसाला जिथे हाकलून घालण्यात आले, तिथे इतरांची काय कथा?

जोवर पुण्यातले लोक 'सकाळ' आणि आंतरजालावरचे लोक 'ईसकाळ' ला प्रोत्साहन देत राहतील तोवर हे असेच चालायचे. फक्त, 'अन्नछत्रात जेवणाऱ्यांनी मिरपूड मागू नये', तद्वत सकाळ वाचणाऱ्यांनी पक्षपाताचे वांझ गाणे गाऊ नये. आपण या वृत्तपत्रासाठी मोजत असलेला पैसा कुणाच्या कारणी लागतो आहे हे डोळे उघडून पाहावे आणि मग खाली मान घालून ते वृत्तपत्र वाचत राहावे.