थेट दूरध्वनीकरिता 'एसटीडी' (सब्स्क्राइबर ट्रंक डायलिंग) ही संज्ञा विशेषकरून ब्रिटन आणि काही भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमध्ये प्रचलित आहे. अमेरिकेत '(डायरेक्ट डायल्ड) लाँग डिस्टन्स*'सारख्या इतर संज्ञा त्याजागी प्रचलित आहेत.

*'ऑपरेटर असिस्टेड लाँग डिस्टन्स'च्या विरुद्धार्थी. (परंतु सामान्यतः अमेरिकेत 'ऑपरेटर असिस्टेड लाँग डिस्टन्स' हा पर्याय उपलब्ध असला, तरी 'डायरेक्ट डायल्ड लाँग डिस्टन्स'च्या तुलनेत सहसा खूपच अधिक महाग असल्याने, आणि बहुतेक परिस्थितींत 'डायरेक्ट डायल्ड लाँग डिस्टन्स' हा पर्याय वापरणे सहज शक्य असल्याने, 'ऑपरेटर असिस्टेड लाँग डिस्टन्स' हा पर्याय फारच कमी प्रमाणात वापरला जात असावा. त्यामुळे सामान्य संभाषणात नुसते 'लाँग डिस्टन्स' म्हटले तरी 'डायरेक्ट डायल्ड लाँग डिस्टन्स' हा अर्थ गृहीत धरला जातो.)

अमेरिकेत 'एसटीडी' हा संक्षेप प्रामुख्याने 'सेक्शुअली ट्रान्स्मिटेड डिसीज़' (अर्थात गुप्तरोग) आणि 'शॉर्ट टर्म डिसॅबिलिटी' (आजारपणामुळे पाच दिवसांहून अधिक परंतु जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत घ्यावी लागलेली रजा आणि/किंवा अशा रजेच्या काळात पगाराच्या अभावी मिळू शकणारा मोबदला आणि/किंवा असा मोबदला पुरवणारी एका प्रकारची पर्यायी विमाव्यवस्था) यांकरिता वापरला जातो.

अवांतरः 'शाळेतील इयत्ता' अशा अर्थी 'स्टँडर्ड' हा शब्द निदान अमेरिकन इंग्रजीत तरी प्रचलित नाही. या अर्थाने या शब्दाच्या वापराचे मूळ हे ब्रिटिश आहे की हिंदुस्थानी** (अँग्लो-इंडियन**) याबद्दल कल्पना नाही. त्याबद्दल अधिक शोध घ्यावा लागेल. परंतु अमेरिकेत असा वापर होत नाही हे निश्चित. अमेरिकेत त्याऐवजी 'ग्रेड' असा शब्द वापरला जातो. ('प्रमाण' यासारख्या इतर अर्थांनी मात्र 'स्टँडर्ड' हा शब्द अमेरिकन इंग्रजीतही वापरला जाऊ शकतो, आणि त्या परिस्थितीत Std. हा संक्षेप अमेरिकन इंग्रजीतही बहुधा योग्य ठरावा. )

**इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा उगम भूतपूर्व ब्रिटिश हिंदुस्थानात आहे. एवढेच नव्हे, तर असे काही इंग्रजी शब्द हे केवळ भारतीय उपखंडातील इंग्रजीत फक्त वापरलेच जातात असे नाही, तर प्रमाणही मानले जातात. इंग्रजीच्या भारतीय उपखंडाबाहेरील कोणत्याही आवृत्तीत त्यांना स्थान नाही. याची 'लॅख' ('लाख' अशा अर्थी) आणि 'क्रोर' ('कोटी', 'करोड' अशा अर्थी) ही उदाहरणे सर्वपरिचित आहेतच; शिवाय वांग्याकरिता 'ब्रिंजल' हा शब्दही याचे खास उदाहरण मानता यावे. (वांग्याला ब्रिटिश इंग्रजीत 'ऑबर्जीन' तर अमेरिकन इंग्रजीत 'एगप्लांट' म्हणतात. 'ब्रिंजल' हा खास भारतीय उपखंडातील इंग्रजी शब्द आहे.)