पावसाची धार का भिजवून हल्ली जात नाही?
एव्हढा दुष्काळ पडला, थेंबही नयनात नाही

हल्ली पाऊस का पडत नाही? इतका दुष्काळ पडला आहे की डोळ्यातही पाणी नाही - असा या शेराचा अर्थ आहे. इथे कुणीतरी 'नयनात' च्या ऐवजी 'डोळ्यात' चालेल का म्हणून विचारले आहे. तो या युगातील एक महान प्रश्न म्हणून बाजुला ठेवू. समजा हा पाऊस 'प्रेमाचा' आहे असे गृहीत धरले तर हल्ली पुर्वीसारखे प्रेम राहिले नाही असे म्हणता येईल. ५६ मात्रा हे सांगण्यासाठी वापरल्या आहेत. समजा खराखुरा पाऊस म्हंटला तरी तेच!

शेवटी आच्छादलो होतो कधी त्या कुंतलांनी ?
शेवटी भिजलो कधी तेही मला लक्षात नाही

गजलेत दोन ओळींमध्ये संबंध असायला पाहिजे हे जरी खरे असले तरी दोन्ही ओळीत तेच सांगीतले तर पुन्हा शेर वायाच जातो. फार तर भिन्नता इतकीच की 'कधी केसांनी आच्छादलो होतो' अन 'कधी भिजलो होतो' ! दोन्हीचा मुख्य आशय तोच! अशा वेळेस एकच ओळ लिहिली तरी चालू शकते. ( तसेच, मतला व हा शेर तेच सांगतायत! हे उलगडणे नसले तरी चघळणे निश्चीत आहे. )

तापल्या मातीस वाटे, लांबला पाऊस यंदा
पावसाला काळजी, अद्याप ती सुस्नात नाही

समजा प्रेयसीला वाटले की 'प्रियकर लक्षच देत नाहीये' तर प्रियकाराला अशी काळजी वाटेल का की 'ती सुस्नातच नाहीये तर मी लक्ष देणार कसे'? ( तेही, ती सुस्नात त्याच्याचमुळे होणार आहे हे त्याला माहीत असताना? )

आजही घडतात भेटी, आजही फुलतात गात्रे
भाग सवयीचाच जादा, अंतरी बरसात नही - गजलेचा शेर! ( मात्र, इतर शेरातीलच अर्थ रिपीटेड! ) - गजलेतील महत्त्वाचा फायदा त्यागला.

आज अर्धोन्मीलितेचे लाजणे ते लुप्त झाले
आज भ्रमराला मधाचा स्वादही अज्ञात नाही - सर्वात सपाट शेर!

बोट नियमांवर धरा ठेवून पुसते पावसाला
बरसण्याआधी तुझी आली कशी दरखास्त नाही? -

आशय अतिशय सुंदर! विशेषतः ( हे मी सर्वसाधारण मत मांडत आहे, अजिबात व्यक्तिगत मानले जाऊ नये. ) हा शेर पती-पत्नी च्या संदर्भात फील केला तर फारच सुंदर आशयाचा शेर! खरे तर बरसातपेक्षाही! पण दरखास्त ने घोळ झाला! 'बरसण्याआधी तुझी चाहूल आकाशात नाही?' असे मला सुचले. बहुधा अर्थ साधारण तसाच राहिला असावा. मात्र, आशयाच्या दृष्टिने या रचनेतील हा सर्वोत्कृष्ट शेर आहे.
( शब्दरचनेबाबतीत: - बोट नियमांवर... धरा... ठेवून... पुसते... पावसाला हा क्रम अनैसर्गीक आहे. )

रीत प्रीतीची फुलांवर रासवट ह्या पावसाची
हा दवाचा पाकळ्यांना मखमली प्रणिपात नाही

शेवटचा शेर अचानक आक्रमक झाला आहे. आत्तापर्यंत प्रियकर हरवलेल्या / निबर झालेल्या प्रेमाचे वर्णन करतोय असे वाटत होते तर या शेरात एकदम आक्रमकपणा! ( असो - यावरून वेगळा वाद नको व्हायला! ).

ही एकंदर 'मुसलसल' गजल म्हंटली तरीही 'शेवटच्या' सोडून प्रत्येक शेरात तोच मुद्दा आहे. तसेच, शेरामधून विचार किंवा भावना न येता एक बातमी मिळत आहे. कवीला काही प्रश्न पडले असावेत किंवा काही भावना आल्या असाव्यात असे न वाटता 'सद्य परिस्थिती ही अशी आहे' असे सांगीतल्यासारखे! याला 'सपाट' असे म्हणतात.

सोनालीताईंनी 'मी या गजलेला सपाट म्हंटले हेमाझे स्वातंत्र्य आहे' असा उल्लेख केल्यामुळे इतके लिहिले. अन्यथा, छोटाच प्रतिसाद सुरुवातीला दिला होता.

'विनोदाचा विषय मी' या माझ्या रचनेत मी यावरच एक ओळ लिहिली आहे, की फंदात नाही पडलो तर ओढला जातो :-)))