राखी स्वतःला भारतीय नारी म्हणवते, मी याला दांभीकपणा म्हणतो
राखी सावंत ही भारतीय नागरिक आहे का? माझ्या कल्पनेप्रमाणे असावी. (निदान मी तरी याहून वेगळे काही ऐकलेले नाही.)
राखी सावंत ही नारी आहे का? पुन्हा, माझ्या कल्पनेप्रमाणे असावी. (पडताळून पाहिलेले नाही.)
म्हणजे 'राखी सावंत ही भारतीय नारी आहे' या विधानात तांत्रिकदृष्ट्या बहुधा काही चूक नसावी. मग दांभिकपणाचा प्रश्न आला कोठे?
हो, आता उद्या जर मी स्वतःला 'भारतीय नारी' म्हणवू लागलो, तर तो (मी भारतीयही नाही आणि नारीही नाही या कारणास्तव) कदाचित दांभिकपणा ठरू शकेल. (पुन्हा, ठरेलच असे नाही, पण ठरण्याची शक्यता सकृद्दर्शनी नाकारता येणार नाही.) पण राखी सावंतच्या बाबतीत अशा आक्षेपाचे कारण दिसत नाही.
राखी स्वतःला " मै सच्ची हूं " म्हणते
राखी सावंत ही व्यक्ती वास्तवात अस्तित्वात आहे की आभासी आहे (केवळ एक दृष्टिभ्रम आहे किंवा आपल्या कल्पनेचा खेळ आहे), हे तपासून पाहावे लागेल. ती आभासी असण्याबद्दल निदान मी तरी काही ऐकलेले नाही, तेव्हा ती वास्तवात अस्तित्वात आहे, असे मानण्यास जागा आहे. त्या परिस्थितीत तिच्या "मैं सच्ची हूँ" या म्हणण्यात तथ्याच्या दृष्टीने काहीही गैर नाही.
(उलटपक्षी, ती आभासी, केवळ दृष्टिभ्रम किंवा आपल्या कल्पनेचा खेळ असल्यास, तिचे "मैं सच्ची हूँ" असे म्हणणेही आभासी, आपल्याच कल्पनेचा खेळ आहे, असे मानून सोडून देण्यासारखे आहे. वास्तवात अस्तित्वात नसलेली व्यक्ती विधाने करू शकत नाही; केवळ आपल्या कल्पनेत अस्तित्वात असलेल्या व्यक्तीची विधानेही काल्पनिक असतात. त्यामुळे राखी सावंत ही व्यक्ती जर काल्पनिक असेल, तर 'मैं सच्ची हूँ' हे किंवा इतर कोणतेही विधान करणे तिला शक्य नाही. असे विधान तिने केले हे - मुळात राखी सावंत हीच काल्पनिक असल्यामुळे - आपल्याच कल्पनेचा खेळ आहे असे मानावे लागेल.)
राखी सावंत ही येणाऱ्या सांस्कृतिक ऱ्हासाची नांदी आहे काय?
माकडाची माणसामध्ये 'उत्क्रांती' जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून सांस्कृतिक ऱ्हासाला सुरुवात झाली असे माझे मत आहे. नांदी कसली घेऊन बसलात?
आजपर्यंत प्रसार माध्यमांनी या विषयाचा चावून चावून चोथा केला आहे, पण राखी सावंत वर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मी याला निर्लज्जपणा म्हणतो, तुम्ही काय म्हणता?
कशाचाही चावून चावून चोथा करणे हा प्रसारमाध्यमांचा उद्योगच आहे. राखी सावंतने त्याला भीक का द्यावी? (किंबहुना प्रसारमाध्यमांच्या प्रेक्षकांनी, श्रोत्यांनी, वाचकांनी तरी त्याला एवढे महत्त्व का द्यावे? त्यांना आपापले उद्योग नाहीत काय?)
राखी सावंतने स्वतःचे स्वयंवर मांडले आहे! मी याला बाजार म्हणतो, तुम्ही काय म्हणता?
तुम्ही राखी सावंतच्या स्वयंवराला बाजार म्हणता. काही जण लग्नाला बाजार म्हणतात. (जसे, 'लग्नाच्या बाजारात आपली किंमत अमक्यातमक्यावरून ठरते' वगैरे वगैरे.) तर काही जण मासळीला बाजार म्हणतात. ('आज बाजार चांगला मिळाला' किंवा 'आजकाल बाजाराच्या किमती एवढ्या वाढल्यात, की आठवड्यातून एकदा जरी बाजार खायला मिळाला, तरी खूप होते' वगैरे वगैरे. चूभूद्याघ्या.)
त्यामुळे कोणी कशाला काय म्हणावे, हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. तुम्ही काय म्हणता (किंवा राखी सावंत काय म्हणते) याला काहीही महत्त्व नाही.
अवांतर:
ते कोणते जुने गाणे होते, कोणाला आठवते काय? 'कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, अनुसरले मी अपुल्याच मना...' की असेच काहीसे?
(किंवा, दुसऱ्या शब्दांत, 'I don't owe the world an explanation'?)