प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.

गझलेच्या दर्जाविषयी कोणत्याही प्रकारचे मत बाळगण्याचा व ते स्पष्टपणे मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. मला ती मते पटो वा न पटो, ती मांडण्याच्या वाचकांच्या अधिकाराचा मी आदर करतो. मात्र, वृत्तात, मात्रांमध्ये मला कोणतीही चूक दिसत नाही आहे. ही फॅक्च्युअल (मराठी प्रतिशब्द ? ), व्यक्तिनिरपेक्ष गोष्ट आहे, इथे प्रश्न मताचा किंवा वैयक्तिक आवडी-निवडीचा नाही.

@ चक्रपाणी - दरखास्त हा शब्द मराठीत फार पूर्वीपासून अधिकृतपणे स्वीकारला गेला आहे. बहुतेक साऱ्या शब्दकोशांत तो सापडेल. केवळ शब्दकोशात आहे असे नाही तर तो सर्रास वापरलाही जातो, खासकरून न्यायालयीन व शासकीय भाषेत व कामकाजात. जे शब्द संस्कृतोद्भव नाहीत त्यांना मराठीत स्थानच नाही अशी जर भूमिका असेल तर तो वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल.

@ सोनालीताई - माझी तळी उचलून धरल्याबद्दल तुमचे विशेष आभार मानतो. 

@ जयंतराव - विचारांती तुम्ही "मखमली प्रणिपात" विषयी  उपस्थित केलेला मुद्दा मला काही अंशी पटला. प्रणिपात हा आदराने किंवा कनिष्ठतेच्या भावनेतून केला जातो, तर मखमली स्पर्श प्रणयाचा द्योतक असतो. आता प्रणय आदराने होऊ शकतो की नाही ह्यावर मत-मतांतरे असू शकतात. 'मखमली' ऐवजी दुसरा एखादा चपखल शब्द आठवण्याचा मी बराच प्रयत्न केला पण जे सुचले त्याने समाधान झाले नाही. त्यामुळे शेराचे पुनर्लेखन करण्याची पाळी आली.

रीत प्रीतीची फुलांवर रासवट ह्या पावसाची
हा दवाचा पाकळ्यांना मखमली प्रणिपात नाही

ऐवजी

रीत प्रीतीची फुलांवर रासवट ह्या पावसाची
हा कणा नसल्या दवाचा रोजचा प्रणिपात नाही

किंवा

ही असे झड पावसाची, आपल्या गुर्मीत येते
हा कणा नसल्या दवाचा रोजचा प्रणिपात नाही

किंवा

येत ही झड पावसाची आपल्या मर्जीप्रमाणे
हा कणा नसल्या दवाचा रोजचा प्रणिपात नाही

ह्या बदलांवर आपले मत कळवावे.