श्रावणीजी, सुसंवाद साधा!
समजा मी तुमच्या सासूबाईंशी बोलतो आहे.
मीः तुम्हाला मरणाची भीती वाटते हे खरे आहे. मग त्याबाबतीत तुमची मुलगा व सून यांच्याकडून काय अपेक्षा आहे?
साः त्यांनी मला धीर द्यावा. लागेल तशी मदत करावी.
मीः ते तर ते करतच आहेत.
पण म्हणून केवळ त्याच कारणाने अमेरिकन सरकार तुम्हाला कायमस्वरूपी अमेरिकेत राहू देईल असे नाही.
साः मग मला काय भारतातच परतावे लागेल? मग मला काही झाल्यास कोण पाहील?
मीः हो. तुम्हाला भारतात परतावेच लागेल.
शिवाय तुमच्या भीतीला मुला-सुनेनी उत्तर शोधावे ही अपेक्षा गैरसमजावर आधारित आहे.
तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवायचे असतात. आणि मुला व सुनेला त्यांचे आयुष्य स्वतंत्रपणे जगू द्यायचे असते.
भारतात, एकाच घरात राहत असलेले मुलगा-सूनही कामाखातर बाहेर गेलेले असतांनासुद्धा काहीही होऊ शकते.
मग अशा वेळी, जे कोणी शेजारीपाजारी असतात, तेच योग्य ती मदतही करतात. तसेच ते आताही करतील.
साः चोवीस तास कोण जवळ राहणार?
मीः म्हणजे? मुला सुनेने चोवीस तास तुमच्या जवळ बसून राहावे अशी तुमची अपेक्षा आहे की काय?
मी तुम्हाला, तुमच्या सासूबाईंना ओळखत नाही. मात्र अशा स्वरूपाच्या प्रश्नोत्तरांतून सुसंवाद साधून आपापले प्रश्न समजावून घेऊन, परस्परांना पूरक, निकोप जीवन सगळेच जगू शकतील. काहीतरी असाधारण अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचे दुःख यांचा वाटा मरणाच्या भीतीत अधिक असतो.
किशोरकुमारच्या एका गाण्यात तर असे म्हटले आहे कीः
कभी बेबसी नि मारा, कभी बेकसी ने मारा ।
गिला मौत से नहीं है, मुझे जिंदगी ने मारा ॥
प्रत्यक्षात माणसाला अपंग जीवनाची भीती असते. मरणाची नाही. त्यामुळे खरीखुरी भीती परावलंबित्वाची असते असे समजण्यास हरकत नाही. न आलेल्या व्याधीने आपण भविष्यात ग्रस्त होऊ, आणि मग अपंगत्व येईल, आपण त्याचा सामना करू शकणार नाही इत्यादी भीत्यांनी मनुष्य गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकत नाही.
जन्म आपल्या हातात नसतो, मृत्यू आपल्या हातात नसतो, दरम्यानचे आयुष्य अनिवार्य असते.
ते आनंदाने, गुण्यागोविंदाने जगायचे मार्ग सगळ्यांनीच शोधायला हवेत.
आपल्या जगण्याचा भार दुसऱ्यावर पडू नये याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी.
अनिवार्य जीवनात आपण स्वावलंबी, स्वतःच्या हातापायावर चालते-फिरते राहून इतरांच्या कमीतकमी मदतीने
जगू शकू, इतरांना मदत करू शकू अशा सामर्थ्यांचा शोध सगळ्यांनीच सदैव घेत राहणे गरजेचे आहे.
सरते शेवटी, चोच देई पाखरांना तोच चारा देत असे, हेच चिरंतन सत्य नाही का?
मात्र, माणूस वगळता इतर कुठल्याही प्राण्यांत, एखादा प्राणी दुसऱ्या एखाद्या प्राण्यावर माणसासारखा अवलंबून राहतांना दिसत नाही. प्रत्येक माणसानेही, म्हणूनच, अधिक स्वावलंबी व्हायचा प्रयत्न करणे आवश्यकच आहे.