विडंबनाला विडंबन कधी म्हणावे याबद्दल मनात आलेले विचार लिहीत आहे. ही नम्र मते आहेत व मान्य होणे न होणे अशा दोन्ही प्रतिसादांची अपेक्षाही आहे व वाटही पाहत आहे.
विडंबनाने खालील अटी पाळायला हव्यात असे वाटतेः
१. कवितेची / साहित्याची निवड - मूळ रचना सुप्रसिद्ध असणे आवश्यक आहे. जेमतेम काल परवा किंवा जन्मून काही तास झालेल्या कवितांचे विडंबन करणे ही 'विडंबक' प्रव्रुत्ती असून प्रतिभेचे निदर्शक वाटत नाही. श्री. मिल्या यांनी 'मालवून टाक दीप' चे 'संपवून टाक पेग' हे विडंबन केले होते. जरी विडंबनावर मी निगेटिव्ह प्रतिसाद दिला होता तरीही कवितेची निवड उत्कृष्ट होती.
२. टीका - विडंबनातून टीका होणे आवश्यक आहे. ते मात्र इथे पाळले गेले आहे : - ) मात्र ही टीका व्यक्तिगत नसावी.
३. प्रतिभा - एक मान्य केलेच पाहिजे की केशवसुमार, खोडसाळ हे कवी मुळात अत्यंत प्रतिभावंत आहेत. त्याशिवाय इतकी सहज विनोदी रचना करणे शक्यच होणार नाही. विडंबन करायला कवीपेक्षाही जास्त प्रतिभा आवश्यक असू शकते असे माझे मत आहे. कारण त्यात मर्यादा असतात. रचनेने मूळ रचनेची आठवण तर करून दिली पाहिजे पण संदेश वेगळाच असला पाहिजे अशी ती मर्यादा! तसेच, केशवसुमार व खोडसाळ यांच्या अनेक ओळी वाचून खरोखरच शुद्ध हसूही येते. ( उदाहरणार्थ : - मी त्याच्या गजलेला मुक्तछंदासारखे वाचतो ही ओळ! ). तेव्हा, ते दोघेही प्रतिभावंतही असून विनोदी लिखाणही करू शकतात हे नक्की!
४ - संदेश - मात्र, विडंबनातून वाचकांसाठी / श्रोत्यांसाठी काही ना काही संदेश जरूर दिला गेला पाहिजे. हा संदेश 'एखाद्या' व्यक्तिच्या बाबतीत' किंवा 'मूळ रचनेच्या' बाबतीत नसता 'सर्वांना लागू होणारा' असा असावा. त्यामुळे आपोआपच सामाजिक विषय हे विडंबनात येणे बऱ्याच अंशी आवश्यक ठरते. आत्ताच मी चित्तरंजन यांच्या 'वाटले बरे किती' च विडंबन वाचले. ( यावरून आठवले या सदरात ते कुठेतरी आले होते त्यामुले क्लिक केले). त्यात काही तरी अशी ओळ आहे की समोर एक 'टंच पोर' राहते पण तिच्या दारावर एक श्वान आहे. या ओळीच्या अस्तित्वाला विडंबनात काही जागाच नसावी. कारण त्यातून फक्त 'विनोद' ही एकच अट पाळली जात आहे. संदेश काहीच नाही.
५ - अभिव्यक्ती - विडंबन विनोदी असलेच पाहिजे. तो विनोद सर्वांनाच विनोद वाटला पाहिजे व कुणालाही दुःख होऊ नये असा असला पाहिजे.
६. - बांधणी - विडंबन हे अत्यावश्यकपणे मूळ रचनेच्याच बांधणीचे व तितक्याच लांबीचे असावे असे माझे मत आहे. मात्र याबाबतीत मला काहीही माहीती नाही.
एका ठिकाणी मात्र मी विडंबनाची एक व्याख्या वाचली ती माझ्या वरील सर्व मतांच्या विरुद्ध आहे. ती व्याख्याही देत आहेच. पण त्यापुर्वी, मी आजवर ज्या विडंबनांना / विडंबकांना टिकास्पद प्रतिसाद दिले त्यांची क्षमा मागून एवढेच सांगतो की त्यांच्या 'पर्सनल' होण्यावर ती टीका होती, प्रतिभेवर , शीघ्रतेवर किंवा विनोदबुद्धिवर अजिबात नव्हती.
मी वाचलेली व्याख्याः
विडंबन
- वस्तू आहे त्यापेक्षा त्याचे भिन्न स्वरूप दर्शवून तिचा उपहास करण्याची क्रिया "विडंबनाचा हेतू नुसताच कुचेष्टा नसून विडंबित गोष्ट सुधारण्याचासुद्धा असतो."