विडंबन (पॅरोडी) म्हणजे काय ह्याच्या व्याख्या व सविस्तर माहिती इथे पाहा. विकिपीडियातील व्याखेचे भाषांतर असे काहीसे होऊ शकेल :
'एखाद्या मूळ रचनेची, वा तिच्या विषयाची, वा रचनाकाराची, वा अन्य कुठल्या तरी लक्ष्याची विनोदाने, उपहासाने किंवा उपरोधाने केलेली थट्टा-मस्करी किंवा टवाळी, किंवा त्यावर केलेली टिप्पणी वा भाष्य.'
या व्याख्येतील "... वा अन्य कुठल्या तरी लक्ष्याची... " हा वाक्यांश नजरेआड करून चालणार नाही.
"रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका" या त्यांच्या लेखसंग्रहातील 'झेंडूची फुले' या प्रकरणात पु. ल. देशपांडे लिहितात,
"मुळातली एखादी चांगली कविता विनोदासाठी विकृत करणं म्हणजे विडंबन नव्हे. एक तर कुठलीही कलाकृती ही नुसतीच विकृती असून चालत नाही. तिच्यात कलागुण असावाच लागतो. चांगली विनोदनिर्मिती ही त्यामुळंच केवळ विकृती राहात नाही. विसंगतीचं दर्शन आणि विकृती ह्यांच्यातला फरक ध्यानात घ्यायला हवा. त्यामुळं विडंबनकविता म्हणजे दुसऱ्या एखाद्या कवितेच्या टवाळीवर चालवलेला बिनभांडवली धंदा नव्हे. कवितेची विडंबनं करायला चांगल्या विनोदबुद्धीच्या जोडीला चांगली कवित्वशक्ती असावी लागते. "
पुढे पु. ल. असेही म्हणतात,
" विडंबन ही मूळ कवितेची किंवा कवीची टिंगलटवाळी आहे, असंही पुष्कळांना वाटतं. विडंबनाचा रोख कशावर आहे हे लक्षात आलं नाही, की हे असं होतं. 'झेंडूच्या फुलां'त अत्र्यांनी 'मनाचे श्लोक' लिहिले आहेत ती काही समर्थ रामदासांची चेष्टा नव्हे. आधुनिक जगात कसं जगावं याचा मोठा साळसूदपणाचा आव आणून उपदेश करताना अत्र्यांनी प्रत्येक श्लोकात सामाजिक दंभ आणि इतर अपप्रवृत्तींकडे गमतीनं लक्ष वेधलं आहे :