विनायक, सन्जोप राव, वादळ आणि सुधीर,

आपल्या प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद.

आमचे कुटुंब 'कसेल त्याची जमीन आणि वसेल त्याचे घर' या कायद्यानुसार झालेल्या अंमलबजावणीने आणि गांधीहत्याप्रकरणामुळे माजलेल्या रणधुमाळीने पाऽऽर देशोधडीला लागले होते. तेव्हा वाघाडीच्या गोरगरीब जनतेनेच वेळोवेळी अडीनडीला जमेल तशी, जमेल तितकी सहृदय मदत केली होती. आज अशा लाखो आशीर्वादांनीच आमची परिस्थिती सुधारली म्हणता समाजाच्या या नाळेशी बंध नाकारणे म्हणजे कृतघ्नताच.. शिवाय आजुबाजुला सगळीकडे नुसत्या अडचणीच आहेत असा नुसता गळा काढत किंकर्तव्यमूढ होऊन बसून राहण्यापेक्षा 'माना की इस जमीं को गुलजार न कर सके, कुछ खार तो कम कर गए, गुजरे जिधर से हम' या तत्त्वानुसार जमेल तितका खारीचा वाटा (मदत 'सत्पात्री'च होतेय ना याची जमेल तितकी शहानिशा करून मगच अर्थात! ) उचलायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. इतरांनाही प्रोत्साहन मिळावे, उपक्रमाची माहिती व्हावी असे ठरवून मी हे लेखन केले नव्हते, तसे पाहता ठरवून काही लिहिणे हा माझा पिंड नाहीच पण माझ्या अनुभवकथनातून ते काम आपोआपच झाल्याचे तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांमधून जाणवल्याने अत्यंत आनंद झाला. पुन्हा एकदा सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.