या कोड्यातल्या सात गाण्यांपैकी "प्यास कुछ और भी भडकादी", "गरजत बरसत भीजत आईलो" आणि "हाय कोई देख लेगा" अशा स्वतःच्याच तीन गाण्याच्या चाली अनुक्रमे संगीतकार खय्याम, रोशन आणि सलील चौधरी यांनी पुन्हा अनुक्रमे "फिर ना कीजे", गरजत बरसत सावन आयो रे" आणि "मिला है किसी का झुमका" मध्ये वापरल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला "आई गोरी राधिका", "ये हवा ये रात ये चाँदनी" आणि "माना जनाब ने पुकारा नहीं" या अनुक्रमे नीनू मुजुमदार, सज्जाद हुसेन आणि सचिनदेव बर्मन यांच्या चाली लक्ष्मीकांत - प्यारेलाल (यशोमती मैया), मदनमोहन (तुझे क्या सुनाउं मैं दिलरुबा) आणि रोशन (धानी चुनर मोरी हाय रे) यांनी वापरल्या आहेत.
यातल्या मदनमोहन यांच्यावर न विचारता चाल वापरल्यामुळे सज्जाद चांगलेच नाराज झाले होते, तर सुमारे तीस वर्षांच्या कालावधीनंतर लक्ष्मी - प्यारेंनी चाल वापरल्यावर संगीतकार नीनू मुजुमदार यांची प्रतिक्रिया समजू शकली नव्हती. खरे सांगायचे तर ही माहितीसुद्धा अगदी अलिकडेच "आई गोरी राधिका" हे गाणे यूट्यूबवर दिसायला लागल्यावर समजली. एक शक्यता अशी आहे की "गोपीनाथ" चा नायक राजकपूर असल्याने त्यानेच लक्ष्मी - प्यारेंना शिफारस केली असावी किंवा दुसरी शक्यता अशी की धार्मिक गाणी म्हणण्याची उत्तर प्रदेश वगैरे भागतली ही पारंपरिक चाल असावी.
रोशनच्या "तेरा दिल कहाँ है" चा प्रकार माझ्या मते मधला आहे. तांत्रिकदृष्ट्या स्वतःच्याच "तेरा दिल कहाँ है" वरून "रहे ना रहे हम" बांधले असावे हे उघड आहे. तरीपण संजोप रावांनी म्हटल्याप्रमाणे "ठंडी हवाएं लहराके आये" या "नौजवान" (संगीतकार - सचिनदेव बर्मन) लताच्या गाण्याची आठवण येतेच. काही वर्षांपूर्वी राहुलदेव बर्मन यांनी एक किस्सा सांगितला होता. १९६६ च्या सुमारास एक दिवस रोशन राहुलदेव यांना म्हणाले "तुला माहिती आहे, 'रहे ना रहे हम' ची चाल मी (सचिनदेव बर्मन) दादांच्या 'ठंडी हवाएं' वरून घेतली आहे? " हे ऐकल्यावर राहुलदेवने वडलांकडे तक्रार केल्यावर सचिनदेव त्याला म्हणाले"रोशनने माझी परवानगी घेतली होती. दुसरे म्हणजे त्याने चाल जशीच्या तशी न वापरता बदलली. हे कौशल्य आहे. मला वाटते चांगला संगीतकार व्हायचे असेल तर ते तू पण शिकून घ्यावेस. " त्यानंतर राहुलदेव ने "सागर किनारे" या गाण्याची चाल "ठंडी हवाएं" आणि "रहे ना रहे हम" वरून तयार केल्याचे सांगितले.
सचिनदेव बर्मन यांना श्रेय देण्यात रोशनच्या मनाचा मोठेपणा दिसतो. सचिनदेव बर्मन रोशनला गुरूस्थानी होते. तरी आमच्यासारख्या रोशनच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न असा "रोशनने सचिनदेव बर्मन यांची परवानगी नेमकी केव्हा घेतली? " म्हणजे "तेरा दिल कहाँ है" हे १९५४ मधल्या "चाँदनी चौक" मधले आहे त्या आधी की "रहे ना रहे हम" हे १९६६ मधल्या "ममता" मधले आहे त्या आधी की "धानी चुनर मोरी हाय रे" हे १९५९ मधल्या "मधु" मधले आहे त्या आधी?
आधी म्हटल्याप्रमाणे आश्वासक प्रतिसादांमुळे हुरूप वाढला आहे. त्यामुळे नवीन भाग लिहीन.
विनायक