मला पुस्तकवाचन अत्यंत आवडते. छापील पुस्तकाइतकेच इ-पुस्तकाचीही मला तितकीच आवड आहे. या दोन्हीत फरक मात्र आहे.. वाचतावाचता झोप लागल्यास दुसरा पर्याय परवडण्यासारखा नाही!

जबरदस्ती करून कुठलीही गोष्ट कोणाकडून करवून घेणे शक्य असले तरीही त्यात आपसुक सातत्य राहत नाही, त्यामुळे तसे न करणे उत्तम. उत्सुकता निर्माण करणे जरा युक्तीचे काम असले तरी एकदा का ते फत्ते केले की मग काहीच करण्याची जरूर उरत नाही. अर्थात प्रत्येकाच्या आवडीनिवडी ओळखून त्याबरहुकुम करावे लागते हे काम हे आलेच. नाहीतर मुलीला आवडतेय सायन्सफिक्षन आणि वडील मागे लागलेत दासबोध तिच्या गळी उतरवण्याच्या असे झाले तर मुलीकडून कसलेच वाचन न होणे याचीच शक्यता जास्त! स्वतःच्या आवडीनिवडी बाजुला ठेवून पाल्याच्या आवडीनिवडीत डोकावून पाहात त्यानुसार युक्त्याप्रयुक्त्या करून वाचनाची आवड लावणे यात काही विशेष अवघड आहे असे नाही. बघा प्रयत्न करून.. जमेलच! सायन्सफिक्षन पासून सुरूवात होऊन दासबोधापर्यंत वाचन घेऊन जायला कालावधी जरूर लागेल पण त्यात अशक्य असे काहीच नाही. मी माझ्या आईला दासबोधाकडून सायन्सफिक्षनपर्यंत आणलंय... आता बोला!