संतानी सत्याचा शोध त्यांच्या पद्धतीने घेतला, आणि त्यांना जे सत्य गवसले त्याचा उच्चार केला. लोकांना संतांची अभिव्यक्ती आवडल्याने संतांच्या या वक्तव्याचा प्रचार आणि पसार झाला.
पण यामुळे एक धोकाही निर्माण झाला.
ओशो (रजनीश) म्हणतात (आणि जे मला पटते), की संतांनी ज्या सत्याबाबत आपले वक्तव्य दिले, ते सत्य त्या संतांना त्यांच्या शोधामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे गवसले होते. पण नंतर, बर्याच लोकांनी, स्वतः शोध न घेता, संतांचे हे वक्तव्य 'सत्य' म्हणून स्वीकारले. आता यामुळे झाले असे, की लोकांना सत्याचा अनुभव तर मिळाला नाही, त्यांच्या जीवनात बदल तर झाला नाही. पण सत्य म्हणून त्यांच्या हाती काही शब्द आले, आणि त्यांचा शोध थांबला.
सत्याच्या शोधाकरता जेव्हा माणूस प्रयत्न करीत जातो, तेव्हा त्या प्रयत्नांमुळेच त्याचे जीवन बदलत जाते, आणि हा बदल पूर्ण झाला की त्याला सत्याचे आकलन होते. पण मुळात जर एखाद्याने याकरता प्रयत्न न करता तयार उत्तर स्वीकारले, तर त्याचे जीवन कसे काय बदलेल ? त्याला सत्याचा अनुभव कसा काय येईल ?
जो माणूस शोधत असेल, त्यालाच संतांचे वक्तव्य 'मार्गातल्या खुणा' म्हणून उपयोगी पडेल; इतरांना नाही.
त्यामुळे, 'अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा' हा तुकोबांचा स्वतःचा अनुभव आहे; 'तुझा तूचि देव, तुझा तूचि भाव' हा ज्ञानोबांचा अनुभव आहे; आणि 'ब्रह्मसत्या जगन्मिथ्या' हा शंकराचार्यांचा अनुभव आहे, आपला स्वतःचा नाही, आणि म्हणूनच आपल्याला आकलन होत नाही तोपर्यंत ही वक्तव्ये केवळ श्रद्धेपोटी, आपले 'सत्य' म्हणून स्वीकारु नयेत असे मला वाटते.