लेख व त्यावरील प्रतिसाद वाचून वैफल्य आले. कडबू, चकोल्या, माडगे या उल्लेखाने बालपण आठवले. सर्दी झाल्यावर आई माडगे करत असे. तूप आणि दूध घालून गरमगरम माडगे थाळी तोंडाला लावून पिऊन गुरगुटून झोपले की सकाळीच जाग येत असे. कडबू हा तर माझ्या विशेष आवडीचा. कडबू स्वतः मऊसर असावा, पण त्याच्या दुमडलेल्या कडा चांगल्या खुसखुशीत असाव्या. कडबूतल्या पुरणात वेलदोडे पाहिजेतच. एकेक कडबूला बोटाने भोक पाडायचे आणि त्यात लहान चमचाभर तूप घालायचे. शाळेतून भिजून आल्यावर चुलीजवळ बसून असे कडबू खावेत. चकोल्याही मजा आणून जात. मोदकांसाठी तर बाप्पांनी लवकर यावे असे वाटे. एका गणेशचतुर्थीला एकवीस उकड्या मोदकाचे ताट एकट्याने संपवल्याचे स्मरते. धपाटे ही तर खास गावाकडची खासियत. त्यातल्या लसणी-कोथिंबिरीचा स्वाद अजून जिभेवर आहे. धपाट्यावर बाकी घरचे लोणी असावे. पाऊस आणि भजी ही तर जुनी जोडी, पण कांदा-बटाट्याच्या जोडीला घोसावळ्याची भजीही खमंग लागत. शिळ्या भाकरीच्या जोडीला डांगरही मजा आणून जात असे. शिरा ही त्या वेळी चैन होती, पण घरच्या (जाड) रव्याचा (तूप-दूध -गूळ घातलेला) सांजा बाकी नेहमी असे. वाटली डाळ त्या वेळी 'मोकळं तिखट' या नावाने ओळखली जात असे आणि कोवळ्या मक्याच्या कणसांच्या उपम्याला 'उसळ' म्हणत. देशी चवळीच्या उसळीला 'अळसुंदाची' उसळ म्हणत. शिळी भाकरी हातावर घ्यावी, त्यावर घट्ट मुगाची किंवा अळसुंदाची उसळ घ्यावी आणि त्यावर डावभर घट्ट साईचे दही घ्यावे. दुसऱ्या हातात एक तळलेली मिरची घ्यावी आणि हे परब्रह्म खात खात घरभर हिंडावे. कधी पत्रावळभर ऊन ऊन गव्हाची खीर वाढून घ्यावी आणि तिचे छोटे छोटे घास जिभेला चकपक चटके देत भरभर खावेत. मधूनच देशी वांग्याच्या मसाला भरून केलेल्या भाजीचा एक घास घ्यावा....
चला, चहाची वेळ झाली. बिनसाखरेचा फुळकवणी चहा घ्यावा झाले...