आपण इतक्या बारकाईने कविता वाचलीत त्याबद्दल धन्यवाद. माझ्या परीने मी उलगडा करायचा प्रयत्न करतो.
नागमोडी रानवाटा, पाखरे गेली उडोनी,
बांधले नव्हतेच घरट्याला कधी चाहूलतोरण ॥
=> तिच्या आणि माझ्यातले आधीचे जे काही दिवस होते, त्यांना 'पाखरे' असं म्हणायचं आहे.
त्या पाखरांसमोरच्या वाटा(म्हणजेच फ्यूचर) ह्या रानवाटा आहेत आणि नागमोडीही. म्हणजेच, एकूणच ओळखी आम्ही पुसल्याच नसल्याने, अर्थातच आमच्या त्या दिवसांचे फ्यूचरही तितकेच अवघड होते, असे काहीसे.
आणि ती पाखरे परत यावीत यासाठी कुणीच चाहूलतोरण बांधलं नव्हतं.
पण कदाचित हे तितकं स्पष्ट होत नसेल या द्विपदीतून. अजून लिखाण नीट व्हायला हवंय.
भरदुपारी येत गेले मेघ काळे, चिंब पाउस-
-अन उसासे खिन्न, आले त्या मिठीला पोरकेपण ॥
=> थोडीशी कवितेशी सुसंगत नसलेली द्विपदी वाटू शकते. पण ह्यातही, आधीचे जे फ्यूचर बद्दल लिहिलेले होते, तोच संदर्भ आहे.
आधीच्या द्विपदीत, फ्यूचर अवघड असल्याचे लिहिले, तेच साक्षात सत्य झाले असे ह्या द्विपदीतून म्हणायचे होते.
एक दिवस कन्सिडर केला, तर त्याची भर-दुपार, म्हणजे ऐन उमेदीचा काळ असे म्हणता येऊ शकते(अर्थात हे माझे मत). आमच्या प्रेमाच्या भर दुपारी काळे काळे मेघ (अर्थात भविष्याबद्दलच्या अस्थिरतेमुळे येणारी भीती) येत गेले. इथे पाऊस "चिंब" म्हणणे थोडेसे चुकीचे असावे. काही वेगळा शब्द सुचतो का ते जरूर बघेन.
त्या मेघ- पावसा बरोबरच खिन्न उसासे आले, अर्थात, ह्या नात्याला भविष्य काहीच नसल्याची स्पष्ट जाणीव झाली. म्हणून मिठीला पोरकेपण आले. (आता ह्या सगळ्या खटाटोपात द्विपदी शब्दबंबाळ झाली )
संधिकाली आजही येतात विस्कटले तराणे,
ओळखीचा स्वर, म्हणूनच ऐकतो गंधाळले क्षण ॥
क्षण गंधाळलेले का बरे असावेत?
=> क्षण गंधाळलेले का बरे नसावेत? असा मला तरी प्रश्न पडला. गंधाळलेले हा पादपूर्तीसाठी नक्कीच आलेला नाही.
गंधाळल्या क्षणांना ऐकणे, म्हणजेच त्यांना पुन्हा पुन्हा आठवणे, बाकी काही नाही. आधीच्या ओळीतील "तराणे" ह्या शब्दामुळे, ते "क्षण ऐकतो" असे लिहिले आहे.
"सन्धि"काली, "विस्कटले" तराणे येतात. हा विरोधाभास. आणि ते तराणे म्हणजे अर्थातच जुन्या विस्कटलेल्या क्षणांच्या आठवणी.
पण तरीही मी ते टाळत नाही, कारण त्यातला स्वर ओळखीचा आहे. असे म्हणायचे होते.
तरीही कदाचित हे नीट लिहिले गेले नसेल.
बघा तुम्हाला पटतंय का ते. हा उलगडा वाचून, परत एकदा कविता वाचून बघावीत.
एकंदर कविता छानच आहे हे वाचून बरे वाटले.
असेच स्पष्ट प्रतिसाद देत राहावेत ही विनंती.